‘सुवर्ण न्यूज’ वाहिनीवर झालेल्या चर्चासत्रात जातीभेद केल्याचा आरोप !
उडुपी (कर्नाटक) – येथील पेजावर मठाचे प्रमुख विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी आणि ‘सुवर्ण न्यूज’ वाहिनीचे सूत्रसंचालक अजित हनुमक्कनवर यांच्याविरुद्ध जातीभेद अन् धार्मिक स्थळी जाती आधारित बहिष्काराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. १२ जानेवारी या दिवशी ‘डॉ. बी.आर्. आंबेडकर सेना’ या दलित संघटनेने बेंगळुरूत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.
१. २७ डिसेंबर २०२३ या दिवशी ‘सुवर्णा न्यूज’ वाहिनीवर झालेल्या श्रीराममंदिर उद्घाटनच्या संदर्भातील चर्चासत्रात श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे विश्वस्त पेजावरस्वामी सहभागी झाले होते. या वेळी ‘अयोध्येच्या श्रीराममंदिरात दलितांना पूजा आणि प्रार्थना करण्याचा अधिकार आहे का ?’ या संदर्भात चर्चा करण्यात आली.
२. चर्चासत्रात दलित संघटनेचे वक्ते नागराज यांनी श्रीराममंदिरात पूजा चालू असतांना दलितांना बाहेर ठेवल्यावरून चिंता व्यक्त केली. त्यावर प्रतिक्रिया देतांना पेजावरस्वामी म्हणाले, ‘‘देवस्थानात एकच जण पूजा करतो. सर्वांना करता येत नाही. देवस्थानातच नव्हे, तर कोणत्याही कचेरीत अथवा संस्थेतही पदावर असणाराच अधिकारी असतो. प्रत्येक जण ते पद प्राप्त करू शकतो; परंतु पदावर नेमालेल्यालाच ती संधी मिळते.’’
३. धार्मिक स्थळांना जातींच्या पलीकडे जाऊन नियम लावण्याच्या नागराज यांच्या सूत्रावरून सूत्रसंचालक अजित हनुमक्कनवर म्हणाले की, तुम्हाला धार्मिक ठिकाणी ‘धर्मनिरपेक्ष’ ठिकाणांचे नियम लावता येणार नाहीत. दोन्हीत सरमिसळ करू नका. शबरीमाला देवळाला तुम्हाला भेट द्यायची असेल, तर त्यांचे काही नियम आहेत. त्यांचे पालन करावेच लागते. नियमांचे पालन न करता आम्ही शबरीमाला येथे जाऊ, असे तुम्ही कसे म्हणू शकता ?