संपादकीय : हुती बंडखोरांमुळे भारताला धोका !

हुती बंडखोर

इस्रायल-हमास, तसेच रशिया-युक्रेन युद्ध हा दीर्घकाळ  लांबलेला आणि जगाची चिंता वाढवणारा विषय आहे. या युद्धांमुळे भूमध्य समुद्रातील वाहतुकीवर बंधने आली आहेत. जहाजांवर आक्रमणे झाल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. लाल समुद्रातील हुतींच्या दहशतीचा व्यापारावर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे मालवाहतूक व्ययात ६० टक्के आणि विमा दरामध्ये २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. थोडक्यात जगातील वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत; कारण हुतींची आक्रमणे टाळण्यासाठी व्यावसायिक जहाजे आता पर्यायी मार्ग वापरत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना लांबचा प्रवास करावा लागतो. गाझामध्ये इस्रायली आक्रमणांच्या विरोधात लाल समुद्रात सतत दहशत माजवणार्‍या हुती बंडखोरांनी सागरी व्यापारव्यवस्था विस्कळीत केली आहे. त्यामुळे महागाईचे संकट अधिक गडद होऊ शकते. आर्थिक संशोधन संस्था ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’(जी.टी.आर्.आय.)ने १३ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, लाल समुद्रातील संकट अधिक गडद झाल्यामुळे मालवाहतुकीच्या वेळेत २० दिवसांचा विलंब आणि एकंदरीत व्ययात ४० ते ६० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. विम्याच्या दरामध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्यासमवेतच चोरी आणि आक्रमण यांमुळे मालाची हानी होण्याचीही शक्यता आहे. लाल आणि भूमध्य समुद्र यांना हिंदु (हिंदी) महासागराला जोडणारा महत्त्वाचा सागरी मार्ग ‘बाब-एल्-मंदेब सामुद्रधुनी’च्या आसपासची परिस्थिती येमेनस्थित हुती आतंकवाद्यांच्या आक्रमणांमुळे बिघडली आहे. या आक्रमणांमुळे जहाजे मार्ग पालटत आहेत आणि ‘केप ऑफ गुड होप’मधून पुढे जात आहेत. यामुळे अनुमाने २० दिवसांचा विलंब होत आहे.

भारतासह विदेशांतील व्यवसायावर परिणाम !

‘हुतींच्या आक्रमणांमुळे लाल समुद्राच्या व्यापार मार्गात व्यत्यय आल्याने भारतीय व्यापारावर विशेषत: पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोप या देशांवर लक्षणीय परिणाम झाला आहे’, असे ‘जी.टी.आर्.आय.’ने अहवालात म्हटले आहे. त्यानुसार भारत कच्चे तेल आणि ‘एल्.एन्.जी.’च्या आयातीसाठी अन् महत्त्वाच्या प्रदेशांशी व्यापार करण्यासाठी बाब-एल्-मंदेब सामुद्रधुनीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. अशा स्थितीत या प्रदेशातील कोणत्याही गतीरोधामुळे प्रचंड आर्थिक आणि सुरक्षा धोके निर्माण होतात. ‘जी.टी.आर्.आय.’चा अंदाज आहे की, भारताच्या युरोप आणि उत्तर आफ्रिका यांसमवेतच्या एकूण उत्पादन व्यापारापैकी अनुमाने ५० टक्के आयातीवर आणि निर्यातीवर ६० टक्के परिणाम होण्याची शक्यता आहे. अलीकडेच जहाजांवरील आक्रमणाने लाल समुद्रातून सुवेझ कालव्यामार्गे युरोपशी होत असणारा व्यापार ठप्प झाला आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक अडचणीत आली. भारतातून युरोपला द्राक्षे, आंबे, केळी यांसह अनेक प्रकारच्या नाशवंत मालाची, तसेच वस्तूंची निर्यात होत असते. आता या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. एकीकडे निर्यातीतून अल्प पैसे मिळणे, तर दुसरीकडे आयात महाग झाल्याने व्यापारात असंतुलन झाले आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांमधील या वादाच्या प्रारंभीपासून हुती बंडखोरांनी आतापर्यंत एकूण १५ व्यापारी जहाजांवर आक्रमणे केली आहेत. मध्यंतरी सौदी अरेबियातून भारतात येणार्‍या एका जहाजाला इराणच्या हुती बंडखोरांनी आक्रमण केले. या जहाजावर काम करणारे लोक भारतीय होते. जहाजात कच्चे तेल असल्याने हुती बंडखोरांच्या आक्रमणाचे परिणाम किती भयानक झाले असते, हे आपण समजू शकतो. त्यामुळेच आता जग सावध झाले आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलही सावध झाले आहे. हुती बंडखोरांनी केलेली बहुतेक आक्रमणे लाल समुद्रात झाली आहेत. या आक्रमणांमुळे जहाज आस्थापनांची झोप उडाली आहे. हुतींची आक्रमणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही मोठे आव्हान बनत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम !

जागतिक अर्थव्यवस्थेसाठी लाल समुद्र महत्त्वाचा आहे. तो आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावतो. या कालव्यातून प्रतिवर्षी १७ सहस्र जहाजे जातात. वार्षिक १२ टक्के जागतिक व्यापार लाल समुद्रातून होतो. सुवेझ कालवा आणि लाल समुद्र यांद्वारे भारताचा व्यापार अनुमाने २०० अब्ज डॉलर्सचा आहे. जहाजांवरील आक्रमणे चालू राहिली, तर कच्च्या तेलाच्या आणि इतर आवश्यक उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. साहजिकच त्यामुळे जागतिक पातळीवर महागाई वाढून अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. बहुतांश विमा आस्थापनांनी लाल समुद्रातून जाणार्‍या जहाजांना विमा देण्यास नकार दिला आहे. ही गोष्टही जहाज आस्थापनांच्या भीतीत भर टाकणारी आहे.

…आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करणार !

हुती बंडखोर हा येमेनमधील अल्पसंख्यांक शिया ‘जैदी’ समुदायाचा एक गट आहे. त्यांच्याकडे अनेक प्रकारची शस्त्रे आहेत. तत्कालीन अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी वर्ष १९९० मध्ये या गटाची स्थापना करण्यात आली होती. हुती बंडखोर अमेरिका, इस्रायल आणि ज्यू लोक यांना आपले शत्रू मानतात. ते स्वतःला इराणचे समर्थक म्हणवतात. इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धाच्या दाहकतेमुळे त्यांना वेगळे अस्त्र मिळाले असून ते त्याचा बिनधास्तपणे वापर करत आहेत. अरबी आणि लाल समुद्रांतून भारतात येणार्‍या जहाजांना लक्ष्य केले जात असल्यामुळे, तसेच ही जहाजे भारताच्या मालकीची नसली, तरी त्यांचे संचालन भारतियांच्या हातात असल्यामुळे भारतालाही ती झळ बसत आहे. लवकरच इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये चालू असणारे युद्ध आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर अमेरिकेने लाल समुद्रातील जहाजांना सुरक्षा देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे. इस्रायलला साहाय्य पोचण्याच्या चिंतेमुळे अरब देशांनी या ‘टास्क फोर्स’मध्ये रस दाखवला नाही. अनेक अरब देशांना या आक्रमणांमुळे हानी सहन करावी लागली आहे; पण ‘टास्क फोर्स’चा लाभ इस्रायलला गाझामध्ये लढतांना होऊ शकतो, असे त्यांना वाटते. समुद्रामध्ये वारंवार होणार्‍या आक्रमणांमध्ये आतापर्यंत किमान १ डझनहून अधिक जहाजे प्रभावित झाली आहेत. त्यामुळे ही गोष्ट भारताला गांभीर्याने घ्यावी लागेल.

जागतिक स्तरावर दिवसेंदिवस आतंकवाद्यांची वाढत जाणारी आक्रमणे रोखण्यासाठी सर्वच देशांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक !