श्रीराम सप्ताह विशेष ! (भाग १)
सर्वच भारतियांसाठी उत्कंठावर्धक ठरणारा २२ जानेवारी २०२४ हा दिवस ! प्रत्येकच जण या दिवसाची आतुरतेने वाट पहात आहे. ५०० वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि गेली अनेक वर्षे लढली गेलेली कायदेशीर लढाई यानंतर हिंदूंचा, पर्यायाने हिंदु धर्माचा विजय झाला आहे. २२ जानेवारीला अयोध्येतून त्याचा उद्घोष सर्वत्र होणार आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेकांसह संत-महंत, धर्मगुरु, महाराज, तसेच काही संप्रदायांचे प्रमुख प्रतिनिधी अशांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. ही संख्या जवळजवळ ४ सहस्रांहून अधिक आहे. यामुळे हा सोहळा धार्मिक-आध्यात्मिक स्तरावर पार पडेल, हे निश्चित ! अयोध्यानगरीतील संत-महंतांचे व्यापक संघटन हे देश-विदेशातील शत्रूंना किंवा भारतविरोधकांना धडकी भरवणारे ठरेल; कारण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच त्यांचे संघटन होत आहे. प्रत्येकी १२ वर्षांनी होणार्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने संतमंडळी एकत्रित जमतात; पण कुंभमेळ्याचे व्यासपीठ हे केवळ आध्यात्मिक स्तरापुरतेच मर्यादित असते. अयोध्येत होणार्या संघटनात धार्मिक, आध्यात्मिक यांसह सामाजिक, राजकीय, अर्थविषयक, वैश्विक इत्यादी अनेक पैलू अंतर्भूत आहेत. त्यामुळे यातून मिळणारी फलनिष्पत्ती कुंभमेळ्याच्या तुलनेत कदाचित् अधिक असेल. त्रेतायुगात आदर्शवत् असणार्या श्रीरामाच्या समवेत सर्व प्रजाजन आनंदी, समाधानी आणि संघटित होते. त्रेतायुगातील श्रीरामाचे तत्त्व आता अयोध्येतील सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा कार्यरत झाले असून तेच सर्वांचे व्यापक संघटन घडवत आहे. संत-महंतांना मिळालेल्या निमंत्रणाच्या माध्यमातून धर्मविजयाची पताका विश्वभरात फडकावण्याची धुरा साक्षात् प्रभु श्रीरामानेच त्यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे या सर्वांचे अयोध्येत होणारे भव्य दिव्य संघटन, म्हणजे रामराज्याची नांदीच होय.
पृथ्वीवर अवतरणार असलेली रामराज्याची नांदी ‘याची देही याची डोळा’ पहाण्याची सुवर्णसंधी सर्वांनाच लाभणार आहे. श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, तिचे पूजन केले, मूर्तीचे दर्शन घेतले आणि अयोध्यानगरी पाहिली, म्हणजे झाले ! इतकेच भारतियांकडून अपेक्षित नाही. श्रीरामाचा वसा पुढे नेणेच कालसुसंगत ठरणार आहे. प्रभु श्रीरामालाही त्याच्या भक्तांकडून हेच अपेक्षित आहे. संत-महंत, धर्मगुरु या सर्वांचे संघटन भारतियांना यासाठी दिशा देईल. ते भारतियांना मार्गदर्शन करतील. संपूर्ण विश्वासाठी हा सोहळा दैदीप्यमान असेलच; पण संतांमधील अत्युच्च भक्तीमुळे ते सर्वसामान्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात हा सोहळा आध्यात्मिक स्तरावर अनुभवू शकतील. श्रीरामाने जशी भक्ती करवून घेऊन सर्वांना राममय केले, तसेच या सर्वांनीही देशातील जनतेला धर्मज्ञान द्यावे, धर्मतेज वृद्धींगत करावे आणि भक्ती करण्यास शिकवावी. श्रीरामाने जसा रावणाचा नाश केला, त्याचप्रमाणे संत, धर्मगुरु यांनी देशातील अन्याय, अत्याचार, तसेच दुष्प्रवृत्ती यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करवून घ्यावेत. श्रीरामाने ज्याप्रमाणे वानरसेनेला घेऊन रामसेतू बांधला, त्याप्रमाणे संतांनी राष्ट्र-धर्म कार्यासाठी नागरिकांचे संघटन करावे. तसे झाल्यासच श्रीरामाची कृपा होऊन रामराज्य अवतरेल. संत-महंत, धर्मगुरु यांच्या संघटनाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन श्रीरामाचे कार्य पुढे नेण्यासाठी, रामराज्याची स्थापना करण्यासाठी आणि त्याची विजयपताका फडकावण्यासाठी प्रत्येकाने श्रीरामाच्या चरणी शरण जावे, हीच प्रार्थना !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.