भारतीय शास्त्रीय संगीतातील जगप्रसिद्ध गायिकांपैकी एक डॉ. प्रभाताई अत्रे यांचे १३ जानेवारी या दिवशी निधन झाले. त्यांचे वय ९१ वर्षे होते. सध्याच्या काळात संगीतात बाजारूपणा वाढला असतांना आयुष्याच्या अखेरपर्यंत संगीत साधना करून स्वत:च्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या प्रभाताई यांच्यासारख्या गायिका विरळाच आहेत. त्या किराणा घराण्याची परंपरा चालवणार्या होत्या. भारतीय शास्त्रीय रागसंगीताचा मूळ गाभा तसाच ठेवून संगीत सादर करण्याच्या परंपरागत आणि विविध पद्धतींमुळे संगीतात काही घराणी निर्माण झाली, त्यापैकी एक असलेले किराणा घराणे प्रसिद्ध आहे. शास्त्रीय संगीत हे केवळ संगीत नसून ते एक अखंड सराव, चिकाटी, तपश्चर्या यांचा मिलाफ आहे. या संगीताचा परिणाम, म्हणजे या संगीतातील विविध राग, सूर हे ऐकतांना रसिक श्रोते मंत्रमुग्ध होणे ! हा परिणाम प्रभाताईंच्या प्रत्येक गाण्याला अनुभवता येतो.
संगीताचा विलक्षण प्रवास
पुणे येथे शिक्षण महर्षि आबासाहेब आणि इंदिराबाई अत्रे यांच्या पोटी प्रभाताईंचा जन्म झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.एस्.सी. आणि विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी संपादन केली. संगीतातील ‘सरगम’ या प्रकारावर संशोधन करत ‘डॉक्टरेट’ (विद्यावाचस्पति) पदवी मिळवली. शैक्षणिक कारकीर्दही चांगली असून प्रभाताईंचा ओढा हा संगीताकडेच होता. त्यांचा संगीताचा प्रवासही विलक्षण असा आहे. त्यांची आई आजारी असतांना त्यांना कुणीतरी ‘शास्त्रीय संगीत शिका, म्हणजे बरे वाटेल’, असे सांगितले; पण त्यांना ते जमले नाही. त्यांनी त्यांच्या मुलीला ते शिकवण्यास सांगितले. त्यामुळे प्रभाताईंना लहानपणीच संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. एक उपचारपद्धत म्हणून प्रारंभ झालेला त्यांचा संगीताचा प्रवास शास्त्रीय संगीतातील तपस्विनीपर्यंत पूर्ण झाला. त्यांनी प्रारंभीचे संगीताचे शिक्षण विजय करंदीकर यांच्याकड घेतले. त्यानंतर हिराबाई बडोदेकर आणि सुरेशबाबू माने या २ गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संगीत साधनेची बैठक बसली.
जादूई आवाज
शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी आलेल्या श्रोत्यांनाही त्याची काही प्रमाणात जाण असल्यास त्याचा त्यांना अधिक लाभ घेता येतो. प्रभाताईंच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली देश-विदेशांत ठिकठिकाणी झालेल्या आहेत. त्यांच्या मैफिलीतील गाणी आजही श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. असे असले, तरी कुणा नवीन व्यक्तीने त्यांची गाणी ऐकली, तरी त्याला त्यातून निश्चितपणे काही तरी अनुभूती येऊ शकेल, एवढे सामर्थ्य त्यांच्या गाण्यात होते. त्यांची राग ‘मारू-बिहाग’मधील ‘जागू मै सारी रैना….बलमा रसिया मन लागे ना’, ही बंदीश, ऐकतांना रसिक श्रोत्यांना स्वर्गीय सुख, तर साधक श्रोत्यांना ध्यान लागल्याची, आनंदाची, मन एकाग्र होण्याची अनुभूती न आल्यास नवल ते काय ! त्यांचे धीरगंभीर, मनाचा वेध घेणारे संगीत, त्याला साथ देणारे आगरा शैलीतील मुजरा नृत्य असा संगम झाल्यास रसिकांना स्वर आणि नृत्य यांच्या अनुपम भेटीची पर्वणीच मिळायची ! प्रभाताईंचे स्वर आणि राग यांनी ओथंबलेले संगीत केवळ काही मिनिटे ऐकले, तरी श्रोता भान हरपून जातो, तर ते काही घंटे ऐकणार्याची अवस्था कशी असेल ? याची कल्पना करता येईल. यातून त्यांच्यात संगीत साधना कशी मुरलेली होती ? हे लक्षात येते.
संगीताचा उपयोग मनाला केवळ विरंगुळा, पालट येथपर्यंत मर्यादित न रहाता व्यक्तीच्या मन:स्थितीत पालट होऊ शकेल, येथपर्यंत होऊ शकतो, हे प्रभाताईंचे संगीत ऐकल्यावर लक्षात येते. संगीताकडे व्यावसायिक दृष्टीने नव्हे, तर साधना म्हणून पहाणार्यांनाच हे सामर्थ्य प्राप्त होऊ शकते, हेसुद्धा तेवढेच खरे ! ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन आणि भावसंगीत या गायकीवरही प्रभाताईंचे प्रभुत्व होते. त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करत. त्यांच्या कलावती रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’ ही रचना श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीस पडत असे. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात पंडित भीमसेन जोशी यांच्यानंतर या महोत्सवाची सांगता ही प्रभाताई यांच्या गायनाने होत होती. भारतातील आणि जगभरातील काही देशांमध्ये त्या ‘संगीताच्या प्राध्यापक’ म्हणूनही कार्यरत होत्या. शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान आहे. संगीतावर त्यांनी मराठी आणि इंग्रजीत एकूण ११ पुस्तके लिहिले. भारत शासनाने त्यांच्या संगीत क्षेत्रातील या योगदानाची नोंद घेऊन त्यांनी ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘पद्मश्री’ या ३ पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीतून गायकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
संगीत शिक्षणातील आदर्श
प्रभाताई यांनीही त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल पद्धतीनेच शिक्षण दिले. त्यांनी ‘स्वरमयी गुरुकुल’ या संस्थेची स्थापना करून पारंपरिक आणि समकालीन संगीत शिक्षण यांचा मेळ घातला. प्रभाताईंच्या शिष्यवर्गात अनेक आकाशवाणी आणि दूरदर्शन कलाकार, पार्श्वगायक, संशोधक, भारतीय संगीत गायक इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय आणि परदेशी कलावंतांचा समावेश असून त्यांच्या १० विद्यार्थ्यांना आजपर्यंत संगीतात ‘डॉक्टरेट’ शिष्यवृत्ती मिळाली आहे. गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणात संगीताकडे केवळ व्यावसायिक दृष्टीने पहाण्याऐवजी साधनेच्या दृष्टीने पहाण्याची दृष्टी विकसित होऊ शकते. परिणामी संगीताची परंपरा आणि त्यातील चैतन्य टिकून रहाते. सध्या लहान गायक मुलांच्या आवाजाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लिटल चॅम्प्स’सारख्या स्पर्धा होतात. चांगला आवाज असलेल्या प्रत्येक मुला-मुलींच्या आई-वडिलांना वाटते की, आपले मूल अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन टीव्हीवर दिसावे, त्याचे नाव व्हावे. असे वाटणे साहजिकच आहे. अशा स्पर्धांमध्ये अधिक करून चित्रपटातील गाणी गायली जातात. त्या ठिकाणी जिंकल्यावर ही मुले काही ना काही तरी गातच असतात; मात्र त्यांना दिशा मिळणे आवश्यक आहे. एका प्रसिद्ध कलाकाराने याविषयी ‘मुलांकडे टॅलेंट आहे; मात्र ते टिकून त्यांना दिशा मिळाली पाहिजे’, असे सांगितले. अशा गुणवत्ता असलेल्या मुलांना प्रभाताई यांच्यासारखे मार्गदर्शक गुरु लाभले पाहिजेत. स्वर-राग अर्थात् शास्त्रीय संगीताची गोडी त्यांच्यात निर्माण होण्यासाठी आणि संगीताच्या मार्गावरून योग्य दिशेने चालण्याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. असे झाल्यास प्रभाताई यांची शास्त्रीय गायनाची परंपरा निश्चितच पुढच्या पिढीत चालू राहील, हे निश्चित !
भारतीय शास्त्रीय संगीताला वेगळी उंची आणि जगभरात नावलौकिक मिळवून देणाऱ्या सूरतपस्विनी डॉ. प्रभाताई |