३ शंकराचार्यांकडून श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे समर्थन !

  • ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद स्वरस्वती यांचाच केवळ विरोध !

  • श्री रामललाच्या दर्शनासाठी पुढच्या काळात जाणार असल्याचे सर्व शंकराचार्यांनी केले स्पष्ट !

चार पिठांचे शंकराचार्य

नवी देहली – अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमाला देशातील ४ शंकराचार्यांनी विरोध केला असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांकडून प्रसारित केले जात आहे; मात्र प्रत्यक्षात ३ शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला समर्थन दिले आहे, तर केवळ ज्योतिष पीठाच्या शंकराचार्यांनी याला धर्मशास्त्राच्या आधारे विरोध केला आहे. या चारही प्रमुख पीठांचे शंकराचार्य कार्यक्रमाला उपस्थित रहाणार नाहीत; मात्र ‘आम्ही नंतरच्या काळात भगवान रामललाच्या दर्शनासाठी अवश्य जाऊ’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

१. शृंगेरी पीठ, पुरी पीठ आणि द्वारका पीठ या पीठांच्या शंकराचार्यांनी कार्यक्रमाचे समर्थन केले आहे. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य आणि द्वारका पीठाचे शंकराचार्य यांनी या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ निवेदन प्रसारित केले आहे, तर पुरी पीठाच्या शंकराचार्यांनीही नंतर या कार्यक्रमाला समर्थन दिल्याचे वृत्त आहे.

२. द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांच्या पीठाकडून प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भगवान श्री रामलला यांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येच्या मंदिराच्या गर्भगृहात होत आहे. ही घटना सनातन धर्माच्या सर्व अनुयायांसाठी अत्यानंदाचीच आहे. आमचे या कार्यक्रमाला पूर्ण समर्थन आहे. ५०० वर्षांनंतर वाद संपला आहे. प्राणप्रतिष्ठेचा सर्व कार्यक्रम वेदशास्त्रांनुसार आणि धर्मशास्त्रांच्या मर्यादेचे पालन करून विधीवत करण्यात यावा. शंकराचार्यांनी केलेल्या विधानासंबंधी जी वृत्ते काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आली आहेत, ती खोडसाळ असून अशा वृत्तांना शंकराचार्यांनी अनुमती दिलेली नाही.

(वरील तीनही निवेदने वाचण्यासाठी संबंधित चित्रावर क्लिक करावे)

३. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य स्वामी भारती तीर्थ यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे की, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या संदर्भात आम्ही मुळातच कोणतेही विधान केलेले नव्हते. सनातन धर्माच्या शत्रूंनी आमच्या तोंडी काही विधाने घालून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.