आजपासून कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे प्रयोग !

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील महात्मा गांधी मैदानावर १३ ते १५ जानेवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे विनामूल्य प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. हे प्रयोग प्रतिदिन सायंकाळी ६.३० वाजता चालू होतील. प्रत्येक दिवशी किमान १० सहस्र नागरिक उपस्थित रहातील, अशी सिद्धता प्रशासनाकडून केली जात आहे. यासाठी बैठक व्यवस्था, वाहनतळ, सजावट सिद्धतेविषयी अधिकार्‍यांकडून पहाणी करण्यात आली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, शिवगर्जना महानाट्याच्या निर्मात्या रेणुका यादव, दिग्दर्शक स्वप्नील यादव यांसह अन्य उपस्थित होते.

या महानाट्यात २०० हून अधिक कलाकार, हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे, तर १४० फूट लांब आणि ६० फूट उंच असे भव्यदिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक आतिषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची नियोजनबद्ध सांगड घालण्यात आली आहे. १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे.