आज पंतप्रधानांच्या हस्ते ‘अटल सेतू’चे लोकार्पण !

मुंबई ते नवी मुंबई प्रवास २० मिनिटांत शक्य !

छायाचित्र सौजन्य : सी पॉझीटीव्ह

नवी मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतू) पूर्ण झाला आहे. या सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी या दिवशी होणार आहे. या सेतूवर प्रवासी वाहनांसाठी २५० रुपये एकेरी पथकर आकारण्यात येईल. हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई या शहरांना जवळ आणेल.

१. मुंबईतून नवी मुंबईत जाण्यासाठी वा नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी नागरिकांना दीड ते दोन घंटे द्यावे लागतात; मात्र हा प्रवास या सेतूमुळे केवळ २० ते २२ मिनिटांत होईल.

२. हा सेतू शिवडी (मुंबई) येथून चालू होतो आणि नवी मुंबईतील चिर्ले येथे संपतो. या सहा पदरी मार्गाचा १६.५ किमीचा भाग सागरी सेतूने व्यापला आहे, तर ५.५ किमीचा भाग हा भूमीवर आहे. या सेतूसाठी २१ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला.

३. सेतू भक्कम करण्यासाठी अत्याधुनिक आणि परदेशी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. पुढील १०० ते १५० वर्षे या सागरी सेतूला कोणताही धोका नसेल.

४. सेतूवरून वाहनचालकांना ताशी १०० किमी वेगाने वाहने चालवता येतील.

५. वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे ४०० छायाचित्रक बसवण्यात आले आहेत.