पंडित कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. त्या निमित्ताने…
‘यावर्षी पंडित कुमार गंधर्व (जन्म – ८.४.१९२४, मृत्यू – १२.१.१९९२) यांचे जन्मशताब्दी वर्ष त्यांचे गायनप्रेमी साजरे करत आहेत. ‘अध्यात्माच्या दृष्टीतून जीवनाकडे पहाणार्या अभ्यासकांसमोर पं. कुमारजींच्या (त्यांचे गायन आवडणारे त्यांना ‘कुमारजी’ संबोधतात.) जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे ठेवणे’, हे या लेखाचे मुख्य प्रयोजन आहे. पं. कुमारजींना फार मोठ्या पूर्वसुकृताने अगदी तरुणपणातच दैदीप्यमान यश प्राप्त झाले; मात्र गुरूंकडून संगीताचे शास्त्र समजल्यानंतर त्यांना स्वतःची मर्यादा लक्षात आली. त्यानंतर संगीतातील मुमुक्षत्वामुळे ते संगीताचे उपासक झाले आणि मग संशोधक, तत्त्वज्ञ अन् संगीतयोगी झाले. ‘पं. कुमारजींच्या निर्गुणी भजनांविषयी काही मांडणे’, हे या लेखाचे दुसरे प्रयोजन आहे. मला पं. कुमार गंधर्व यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
११ जानेवारी २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पंडित कुमार गंधर्व यांच्या गायनाची पार्श्वभूमी, लिंगायत स्वामीजींनी ‘कुमार गंधर्व’, असे नामकरण करणे, गायनाविषयी भारतभर प्रसिद्ध असतांना स्वतःच्या संगीतातील अपूर्णतेची तीव्र जाणीव होणे आणि गायन बंद करायला लावणारा नियतीचा आघात’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(या लेखात ते ते गीत ऐकण्यासाठी ‘लिंक’ / ‘क्यू.आर्. कोड’ दिले आहेत. त्या त्या सूत्राचे वाचन करतांना वाचक तेथेच ते गीत ऐकू शकतात.)
(उत्तरार्ध)
पूर्वार्ध : https://sanatanprabhat.org/marathi/753841.html
१०. क्षयरोगातून मुक्त होऊन पुन्हा गायनाला आरंभ होणे
वर्ष १९५२ मध्ये ‘स्ट्रेप्टोमायसिन’ या क्षयविरोधी प्रतीजैविकाचा शोध लागून ते भारतात उपलब्ध झाले. पं. कुमारजींना हे औषध चालू करण्यात आले. त्यामुळे ते क्षयरोगातून बरे होऊन परत गाऊ लागले.
११. नियतीचा झालेला दुसरा आघात !
दुर्दैवाने अल्पावधीत कुमारजींच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. नंतर त्यांनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी दुसरा विवाह केला. याही चांगल्या गायिका होत्या. या दोन्ही पत्नींचे त्यांच्या जीवनात मोठे योगदान होते.
१२. पं. कुमारजींच्या श्रवणसाधनेने भारतीय संगीताला निर्गुणी भजनांची लाभलेली अमूल्य देणगी !
पं. कुमारजींच्या देवास येथील वास्तव्याच्या काळात झालेल्या श्रवणसाधनेतून भारतीय संगीताला निर्गुणी भजनांची एक अनमोल देणगी मिळाली. या भजनांचा उगम त्यांना माळव्यात ऐकायला मिळालेल्या आणि मौखिक परंपरेने म्हटल्या जाणार्या लोकगीतांमध्ये आहे. पं. कुमारजींनी या गीतांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या व्यासपिठावर आणले. त्यामुळे ही भजने आणि त्यातील आशय दूरवर पोचला. त्यामुळे कित्येकांना ‘माया’, ‘ब्रह्म’, ‘निर्गुण’, ‘सगुण’, ‘अनाहत नाद’, ‘सद्गुरूंचे महत्त्व’, अशा प्रकारच्या आध्यात्मिक संज्ञांचा परिचय झाला आणि ऐकणार्यांची अध्यात्माकडे पहायची दृष्टी पालटली.
प्रारंभी कुमारजींच्या निर्गुणी भजनगायनाची काहींनी ‘भिकार्यांची गाणी गातो’, अशा शब्दांत हेटाळणी केली. तरीही त्या गाण्यांतून मिळणारा अनुभव आणि त्यांना समजलेले तत्त्वज्ञान यांवर पं. कुमारजींची पूर्ण श्रद्धा होती. त्यामुळे ते निर्गुणी भजने गात राहिले. आताच्या काळात पं. कुमारजींचे शिष्यच नाही, तर अन्य अनेक गायक अशा प्रकारची भजने मोठ्या व्यासपिठांवरून गातात.
१३. पं. कुमारजींची निर्गुण भजनांविषयीची दृष्टी !
सामान्यपणे कानी पडणार्या भगवंताच्या भजनांमधील आणि निर्गुणी भजनांमधील भेद समजून घ्यायला हवा. सगुण हे दृश्य रूपाचे वर्णन, तर निर्गुण हे आत्म्याचे वर्णन आहे. सगुणाचे वर्णन करणे सोपे आणि तुलनेने सहज करता येते.
१३ अ. निर्गुणाचे वर्णन शब्दांत करणे कठीण असून निर्गुण भजनांमधील भाव गायनातून श्रोत्यांपर्यंत पोचवणे पुष्कळच अवघड असणे : पं. कुमारजी सांगतात, ‘निर्गुणी भजनांत आत्म्याची स्थिती आणि आत्मज्ञानाचे टप्पे यांचे वर्णन असते. मुळात निर्गुणाचे वर्णन शब्दांत करणेच जिथे फार कठीण आहे, तिथे ते अभंग रचयित्या संतांना अभिप्रेत भाव गायनातून श्रोत्यांपर्यंत पोचवणे निश्चितच पुष्कळ अवघड आहे. ती भजने ऐकणार्यांना त्या रचनेतील भाव जाणवायला हवा. त्यासाठी ‘स्वर, लय आणि शब्द कसे फेकायचे ?’, हे त्या वातावरणात गेल्यावरच कळते.’ ते सांगतात, ‘निर्गुणी भजन शिकवणे फार कठीण आहे. एकतर शब्दोच्चार जमत नाहीत किंवा नाद निर्माण होत नाही किंवा हे सर्व एकमेकांत जुळत नाही.’
१३ आ. अत्यंत अल्प वाद्यांच्या साथीत संत कबीर, नाथपंथी योगी गोरक्षनाथ आणि देवनाथ यांची निर्गुणी भजने म्हणणे : पं. कुमारजींनी गायलेल्या बहुतांश निर्गुणी भजनांचे रचयिता संत कबीर असले, तरी त्यातील काही भजने प्रसिद्ध नाथपंथी योगी गोरक्षनाथ आणि देवनाथ यांचीही आहेत. संगीताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग, म्हणजे पं. कुमारजींनी ही भजने म्हणतांना अगदी मोजक्या वाद्यांचा वापर केला आहे. एखाद्या भजनात केवळ तानपुरा आहे; मात्र या तानपुर्यांच्या योग्य वापरावर पं. कुमारजींचा अतिशय कटाक्ष असे. त्यामुळे काही वेळा भजनातील शब्द संपले, तरी तानपुर्याचा नाद आपल्या आतमध्ये गुंजत रहातो.
१४. विदेशी संशोधक महिलेला पं. कुमार गंधर्व यांनी गायलेले निर्गुण भजन ऐकतांना आलेली अनुभूती
श्रीमती लिंडा हेस या विदेशी महिलेने पं. कुमारजींनी गायलेल्या निर्गुणी भजनांवर पुस्तक लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘पहिल्यांदा मी पं. कुमार गंधर्व यांचे ‘निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा’ या भजनाचे ‘स्टुडिओ रेकॉर्डिंग’ ऐकतांना एक मोठा ऊर्जास्रोत माझ्यावर येऊन आदळला’, असे मला वाटले आणि स्वतःमधील अनामिक भय एकदम क्षीण होऊन गेले !’ (http://tinyurl.com/npyra2t8) ही गोष्ट पं. कुमारजींच्या निधनानंतरची आहे.
१५. निर्गुणी भजनांविषयी साधकाला जाणवलेली सूत्रे
१५ अ. निर्गुणी भजने ऐकल्यावर मन आणि शरिरातील सर्व रस शांत होऊन भजनांचा अर्थ अन् नाद मनात काही वेळ घुमत रहाणे : मी साधनेला आरंभ करण्याआधी मला पं. कुमारजींची ख्याती ठाऊक होती. ‘उठी उठी गोपाळा..’ , ‘ऋणानुबंधांच्या…’ यांसारखी त्यांची गाणी माझ्या मनात बसली होती. मी त्यांची काही निर्गुणी भजने ऐकलीही होती; परंतु तेव्हा वरवर ‘छान वाटणे’ या पलीकडे फार काही जाणवले नव्हते. काही मासांपूर्वी पं. कुमारजींनी गायलेले ‘शून्य गढ शहर बस्ती’ हे भजन ऐकल्यानंतर काही काळ मन आणि शरिरातील रस अतिशय शांत झाले.(http://tinyurl.com/y76fxndu) त्यांची निर्गुणी भजने ऐकतांना मी बर्याच वेळा अशी स्थिती अनुभवली. त्यांनी गायलेल्या या निर्गुणी भजनांमधील अर्थ आणि नादाची संवेदना ती ऐकल्यानंतर काही काळ संपूर्ण देहात फिरत रहातात.
या निर्गुणी भजनांची सूची मोठी आहे. ‘बिन सत्गुरु नर रहत भुलाना…’, ‘अवधुता कुदरत की गती न्यारी…’, ‘सुनता है गुरु ग्यानी…’, ‘राम निरंजन न्यारा रे…’, ‘उड जायेगा हंस अकेला…’ ही त्यातील काही भजने आहेत.
१५ आ. पं. कुमार गंधर्व यांची भजने ऐकून ‘तणावरहित शांती आणि स्वस्थपणा’ अनुभवणे : आजवर ‘मन निर्विचार होणे’, म्हणजे ‘मन कशावर तरी एकाग्र झाल्याने मनातील विचार जाणे’, अशी माझी समजूत होती; परंतु ही निर्गुणी भजने ऐकतांना मला जाणवले, ‘माझ्या ‘मी’च्या जाणिवेचा स्तर पालटून तो अधिक खोल होत आहे आणि आपोआप माझ्या मनातील विचार नाहीसे होतात. ‘मी’च्या जाणीवेशी संबंधित भावनांसह असलेले विचार या स्तरावर नसतात. असते ती केवळ तणावरहित शांती आणि स्वस्थपणा !
१६. संगीताविषयी संशोधक आणि तत्त्वज्ञ भूमिका असलेले संगीतयोगी पं. कुमार गंधर्व !
पं. कुमारजींनी काही नवीन आणि जुने रागही शोधून काढले. त्यांनी संगीतामध्ये अनेक प्रयोग केले. त्यांनी लोकगीतांचा अभ्यास केला. ते सांगत, ‘मला संगीत कळते’, हा चष्मा काढून लोकगीते ऐका’, म्हणजे ती किती वरच्या दर्जाची आहेत’, हे समजेल. लोकगीत गाणारा स्वाभाविक आवाजात गातो. त्याला कुणाला खुश करायचे नसते ! ’ राग संगीताविषयी एकाने त्यांना प्रश्न विचारला, ‘‘राग संगीत नसते, तर काय झाले असते ?’’ पं. कुमारजी म्हणाले, ‘‘काही बिघडले नसते. कदाचित चांगलेही झाले असते. व्याकरण नसले, तर भाषा नाही का ? पक्ष्यांना कुठे आहे व्याकरण ?’’
पं. कुमारजींचे संगीतातील योगदान, त्यांचे गायन यांविषयी लिखाण करू तेवढे थोडे आहे !
१७. पं. कुमारजींच्या चरित्रातून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. ‘कलेतील दैदीप्यमान व्यावहारिक यश’, म्हणजे साधनेतील उत्कर्षबिंदू नव्हे ! ‘कलेच्या माध्यमातून व्यावहारिक यशप्राप्ती होणे आणि साधना होणे’, या दोन भिन्न गोष्टी आहेत.
आ. व्यावहारिक यश आणि प्रतिष्ठा यांच्या पार्श्वभूमीवर ‘आपल्या अपूर्णतेची खंत असणे’, हीच खरी अंतर्मुखता !
इ. आपल्याला रस असलेल्या विषयाची विशालता त्या क्षेत्रातील ज्ञात्यांकडून समजून तसे प्रयत्न करणे, हा खरा साधनेचा आरंभ !
ई. त्या त्या कलेतील मूलभूत तत्त्वाचा साक्षात्कार म्हणजे अनुभूती !
उ. आलेल्या कठीण परिस्थितीमध्ये कलाप्रदर्शनाचा आग्रह न ठेवता एकमनाने जे उपलब्ध आहे, ते शिकत रहाणे, हे खरे मुमुक्षत्व !
ऊ. झापडबंद न रहाता साधनेच्या दृष्टीतून आपल्या समोर असणार्या आपल्या कलेतील गोष्टींचा सखोल अभ्यास करणे, ही संशोधक वृत्ती !
ए. या अभ्यासाचे प्रयोगशील चिंतन, ही तत्त्वज्ञ वृत्ती !
ऐ. कलेतून चालू असलेला साधनाप्रवास अखंडपणे चालू ठेवणे, हे योगीत्व !
संगीत ही एक नादब्रह्माच्या साक्षात्काराची साधना आहे. या दृष्टीतून पं. कुमारजींना संशोधक, तत्त्वज्ञ, संगीतयोगी या उपाध्यांनी गौरवणे इष्ट होईल. पं. कुमार गंधर्व यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात कृतज्ञतापूर्वक ही लेखरूपी आदरांजली !
(समाप्त)
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१२.२०२३)