विश्व मराठी संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद !

विदेशी रसिकांना ७५ सहस्र रुपये, तर महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या मानधनाचा उल्लेख नाही !

नवी मुंबई – येत्या २७ ते २९ जानेवारी या कालावधीत नवी मुंबई येथील सिडको येथे आयोजित विश्व मराठी संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झाला आहे. विदेशी रसिकांना संमेलनात सहभागी होण्यासाठी ७५ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत, तर महाराष्ट्रीय साहित्यिकांच्या मानधनाचा साधा उल्लेखही पत्रिकेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी या निमंत्रणावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना याविषयी प्रश्न विचारले आहेत.

श्रीपाद जोशी म्हणाले…

१. संमेलनात नेमके कशासाठी यायचे आहे ? कोणत्या कार्यक्रमात सहभाग नियोजित आहे कि केवळ टाळ्या वाजवायला आम्ही उपस्थित रहायचे आहे ?

२. केवळ उपस्थिती नोंदवायला आम्ही यायचे, असा याचा अर्थ असेल, तरीही येणे-जाणे, निवास, भोजन इत्यादी आणि अनुषंगिक व्यय निमंत्रितांनी स्वतः करायचा आहे का ? असल्यास ते कळवायला हवे. निमंत्रण पत्रिकेवरून तसा बोध होत नाही. ’’

३. महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखकांना अशा रितीने निमंत्रणे देणे, हा त्यांचा अवमान आहे, हे गेल्या वर्षीही कळवले होते. या प्रकाराच्या निषेधार्थ विश्वकोश मंडळ, साहित्य आणि संस्कृती मंडळ अध्यक्ष यांना या क्षेत्राची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी त्यागपत्र द्यावे लागले होते. संबंधित मंत्रीमहोदयांच्या आश्वासनानंतर ते परत घेतले गेले. सरकारची यात बरीच नाचक्की झाली होती.तोच प्रकार यंदा घडणार नाही, अशी अपेक्षा होती; मात्र परदेशातील लोकांना उपस्थित रहाण्यासाठी अगोदरच पैसे दिले जाणार आहेत.

४. भेदभावपूर्ण आणि अवमानकारक वातावरणात गेल्या वर्षी हे संमेलन झाले, त्याचीच पुनरावृत्ती यंदा झाली आहे. मराठी भाषा मंत्री केसरकर यांनी याचा खुलासा करावा.’’

संपादकीय भूमिका 

मानधनावरून वाद करण्यापेक्षा मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत !