परात्पर गुरु डॉक्टरांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या वेळी (ब्रह्मोत्सवाच्या वेळी) म्हापसा, गोवा येथील कु. आरती नारायण सुतार यांना आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ब्रह्मोत्सव सोहळ्याआधी

१ अ. पूर्वसूचना मिळणे

१ अ १. आत्मनिवेदन करतांना दिसलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपरण्याचा रंग प्रत्यक्षात ब्रह्मोत्सवाच्या वेळी त्यांनी घेतलेल्या उपरण्याच्या रंगाप्रमाणाचे असल्याने आनंद वाटणे : ‘४.४.२०२३ या दिवशी संध्याकाळी ६.३३ वाजता आत्मनिवेदन करत असतांना मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. दिसले. तेव्हा त्यांनी लाल रंगाचे उपरणे घेतले होते. त्यांचे आसन लाकडापासून बनवलेले होते आणि त्यावर बारीक नक्षीकाम केले होते. परात्पर गुरु डॉक्टरांचा चेहरा हसतमुख होता. ‘माझ्याकडे फिकट लाल रंगाचा पोषाख. ‘तो रंग छायाचित्रात कसा दिसतो ?’, हे बघण्यासाठी त्याचे छायाचित्र काढायला एका साधिकेने मागितला होता. तेव्हा मला वाटले, ‘आत्मनिवेदन करतांना मला दिसलेला परात्पर गुरुदेवांच्या उपरण्याचा रंग प्रत्यक्ष पहायला मिळतो कि काय ?’ हे घडत असतांना मला आनंद मिळत होता. ११.५.२०२३ या दिवशी दुपारी ४.३० वाजता परात्पर गुरु डॉक्टरांना जन्मोत्सवाच्या ठिकाणी पाहिल्यावर ४.४.२०२३ या दिवशी दिसलेल्या दृश्याचे स्मरण झाले. जन्मोत्सवाच्या वेळी गुरुदेवांनी फिकट लाल रंगाचे उपरणे घेतले होते आणि त्यांचे आसन लाकडापासून बनवले होते. हे पहाताच गुरुचरणी कृतज्ञता वाटली. ‘ही एक प्रकारे पूर्वसूचनाच होती’, असे मला वाटले आणि त्यातून आनंदही घेता आला.

१ अ २. ब्रह्मोत्सवाच्या दिवशीचे आश्रमातील वातावरण स्वप्नात आधीच दिसले होते, याची प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी निश्चिती होणे : ६.४.२०२३ या दिवशी पहाटे ५ वाजता मला स्वप्नामध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम दिसला. आश्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सिद्धता चालू होती. सर्वत्र धावपळ चालू होती. सर्वजण छान सिद्ध झाले होते. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संबंधी सेवा करणार्‍या साधकांना कार्यक्रमाला जाता येत नाही’, असे मला स्वप्नात दिसले. प्रत्यक्षातही ब्रह्मोत्सव चालू झाला. तेव्हा मला दिसलेले स्वप्न जुळत होते, तसेच जन्मोत्सवाच्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संबंधी सेवा करणार्‍या साधकांना कार्यक्रम स्थळावरून आश्रमात लवकर परत यावे लागले. त्यामुळे असे वाटले, ‘देव स्वप्नाच्या माध्यमातून पूर्वसूचना देतो आणि प्रत्यक्ष घडल्यावर त्यामधील आनंदही घ्यायला शिकवतो.’

कु. आरती सुतार

१ आ. गुरुदेवांनी मायेतील अडचणी सोडवून ब्रह्मोत्सव सोहळ्यात सेवा करण्याची संधी देणे

वर्ष २०२२ मध्ये मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या आधी आश्रमात नव्हते. त्यामुळे मला सेवेमध्ये सहभागी होता आले नव्हते. या वर्षी ‘सेवेची संधी चुकवायची नाही. कितीही अडचणी आल्या, तरी त्यांवर मात करून पुढे जायचे’, असे मी ठरवले होते. सोहळा जसजसा जवळ येत होता, तशा वैयक्तिक अडचणीही येत होत्या. अडचणींवर मात करून पुढे जाणे कठीण होते. ही एक प्रकारची परीक्षाच होती. या वेळी अडचणी तर आल्या; पण त्यावर गुरुदेव योग्य तो मार्ग दाखवून पुढे घेऊन जात होते. त्यांनी दाखवून दिले, ‘मायेतील अडचणींपेक्षा अध्यात्म सर्वश्रेष्ठ आहे.’ शेवटी गुरुदेव जिंकले आणि मोहमाया हरली. वैयक्तिक अडचणींवर मात करून मला या सोहळ्यात सेवा करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृज्ञता व्यक्त करते.

१ इ. गुरुदेवांनी प्रत्येक सेवेतून आनंद देणे

मला ‘सोहळा आहे’, असे समजले. तेव्हा माझ्याकडून त्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त झाली; पण त्यावरही गुरुदेवांनी योग्य विचार दिला आणि माझ्याकडून प्रयत्न करून घेतले. त्यांनी माझ्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सेवा करून घेतली आणि मला प्रत्येक सेवेतून आनंद दिला. जन्मोत्सवाची सेवा चालू झाली. तेव्हापासून डोळे बंद केल्यावर गुरूंचेच रूप समोर येत होते अणि ते प्रत्यक्ष पुढ्यात असल्याची अनुभूती येत होती.

१ ई. ‘ब्रह्मोत्सवासाठी साधकांना दिलेली उत्सवचिन्हे (बिल्ले) पाहून ‘येणार्‍या आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी स्मृतिचिन्हे दिली आहेत’, असे वाटून भाव जागृत होणे

ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी साधकांना उत्सवचिन्हे (बिल्ले) दिली होती. त्यांकडे पाहून माझा भाव जागृत झाला आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. ‘देवाने सर्वांवर कृपा केली आहे. आम्हा सर्वांना ईश्वरी राज्यात सामावून घेतले आहे. येणार्‍या आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी साधकांना स्मृतिचिन्हे दिली आहेत’, असे मला वाटले. ‘गुरुदेवांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष देवाकडून स्मृतिचिन्हे मिळणे, म्हणजे त्यांनी ईश्वरी राज्यात सर्वांचे स्वागत केले आहे’, असे मला वाटले.

(उत्सवचिन्हे (बिल्ले)- ब्रह्मोत्सवाची आठवण रहावी; म्हणून साधकांना दिलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र असलेले गोल चिन्ह)

२. सोहळ्याच्या वेळी

२ अ. जन्मोत्सवानिमित्त आश्रमात भजने लावली होती. ती ऐकून माझी भावजागृती झाली.

२ आ. सोहळ्याच्या दिवशी साधिकेला ‘केवळ गुरुदेवांसाठी सिद्ध झाले आहे’, असे वाटून वेशभूषा करण्यातील आनंद घेता येणे

सोहळ्याच्या दिवशी सिद्ध होतांना एक वेगळाच आनंद वाटत होता; कारण हा आनंद आध्यात्मिक होता. ‘आज मी स्वतःसाठी किंवा कुणासाठी सिद्ध झाले नसून, केवळ गुरुदेवांसाठीच सिद्ध झाले आहे’, याचा मला आनंद अधिक होता. त्यामुळे मला वेशभूषा करण्यातील आनंद घेता आला. कार्यक्रमात जे नृत्य सादर केले होते, त्याप्रकारची मी वेशभूषा केली होती. त्यामुळे तेथे भेटणारा प्रत्येक साधक ‘तुम्ही नृत्यामध्ये होता का ?’, असे मला विचारत होता. त्यामुळे नृत्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला नसूनही सहभागी असल्यासारखे वाटत होते आणि त्यातून आनंद मिळत होता.

२ इ. गुरुदेवांविषयीचा फलक पाहिल्यावर गारवा जाणवणे आणि कृतज्ञता व्यक्त होणे

गाडीतून कार्यक्रमस्थळी जातांना गुरुदेवांविषयी लिहिलेला फलक पाहिल्यावर मला गारवा जाणवू लागला. त्या वेळी वातावरणामध्ये पालट जाणवत होता, तसेच पटांगणाचे भव्य रूप पहाताच माझे डोळे भरून आले. असे भव्यरूप मी अन्य कुठेही पाहिले नव्हते. मी प्रथमच एवढे सुंदर दृश्य पाहिले. कार्यक्रमस्थळी जातांना लावण्यात आलेले फलक आणि कार्यक्रमस्थळाची केलेली सिद्धता पाहून गुरुदेवांविषयी कृतज्ञता वाटली अन् भाव जागृत झाला.

२ ई. गुरुदेवांना पाहिल्यावर भावाश्रू येणे आणि देवाजवळ जाण्याची ओढ वाढणे

कार्यक्रम चालू झाल्यावर प्रत्यक्ष गुरुदेव आले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. साधक रथाची दोरी ओढत असल्याचे पाहून ‘ते दृश्य देवलोकातील आहे’, असे मला वाटले. गुरुदेवांना पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले आणि देवाजवळ जाण्याची ओढ वाढली.’

– कु. आरती नारायण सुतार, म्हापसा, गोवा. (१५.५.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक