ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ‘ईडी’ची धाड !

मुंबई – ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ९ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वाजता धाड घातली. रवींद्र वायकर यांच्या घरासह त्यांचा ‘मातोश्री’ नावाचा क्लब आदी ४ ठिकाणी धाड घालण्यात आली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी ही धाड घालण्यात आली आहे.

जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ‘जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचे पंचतारांकित हॉटेल बांधले’, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी सोमय्या यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अन्वेषण यंत्रणेने रवींद्र वायकर यांना चौकशीलाही बोलावले होते. सप्टेंबर २०२३ मध्ये रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

चूक नसेल, तर घाबरण्याचे कारण नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

अंमलबजावणी संचालनालय महाराष्ट्र सरकारच्या हातात नाही. त्यामुळे चूक नसेल, तर आमदार रवींद्र वायकर यांना घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाच्या काळात किती भ्रष्टाचार झाला ? हे तुम्हाला ठाऊक आहे. आम्ही राज्याला पुढे नेण्याचे काम करत आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकर यांच्या घरावर घालण्यात आलेल्या ‘ईडी’च्या धाडीविषयी पत्रकारांपुढे व्यक्त केली.