एस्.एस्.सी. (१० वी च्या) सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढला ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

प्रश्नपत्रिका पाहताना डावीकडून आमदार गणेश नाईक

नवी मुंबई, ७ जानेवारी (वार्ता.) – एस्.एस्.सी. बोर्डाच्या धरतीवरील एस्.एस्.सी. सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथे केले. श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित एस्.एस्.सी. सराव परीक्षेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. मागील २५ वर्षांत दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेचा लाभ घेत विविध क्षेत्रांमध्ये यश प्राप्त केले आहे.

या प्रसंगी ‘श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ट्रस्टचे सचिव तथा नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाभा अणुशक्ती केंद्राचे निवृत्त ज्येष्ठ वैज्ञानिक अनंत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

संजीव नाईक यांनी प्रास्ताविकामध्ये दहावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणामध्ये सामोरे जाऊन यश संपादित करण्यासाठी ही सराव परीक्षा चालू केल्याचे सांगितले. एस्.एस्.सी. बोर्डाप्रमाणेच ही सराव परीक्षा घेतली जाते. यावर्षी ८५ शाळांमधील एकूण ९ सहस्र ९०० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. २६ केंद्रांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधून ही परीक्षा घेतली जाणार आहे.