वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून पांडुरंगावरील अभंग, गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे. वासुदेव त्याच्या गीतांमधून जे तत्त्वज्ञान सांगतो, त्यामध्ये दैववाद आहे; मात्र आजकाल ही परंपरा लुप्त झाली आहे. सध्याच्या मुलांना वासुदेव कोण होता ? ते माहिती नाही; कारण आपण आपल्या लुप्त होणार्या या लोकपरंपरांचे जतन करण्याच्या दृष्टीने विचार करत नाही. सध्या काही शहरात वासुदेवाची टोपी घालून काही जण चक्क पैसे मागण्याचा धंदा करतात. ते जी गाणी गातात, तीही बेसूर असतात. वासुदेवाची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या लोककलांमध्ये शिरलेला विकृतपणा रोखला पाहिजे. पूर्वी सर्व वासुदेव हे कृष्णाचे भक्त असत. कृष्णाने काम सांगितले, त्याची आठवण म्हणून त्यांनी त्याचा वेश आणि नावही त्याचेच घेतले, असे म्हणतात.
मराठी संस्कृतीतील वासुदेवाची परंपरा सुमारे सहस्रो वर्षे जुनी असावी, असा अंदाज आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम, संत नामदेव यांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळतात. वासुदेव ही जणूकाही समाजप्रबोधन करण्याची चालती बोलती शाळाच होती. या दारोदार जाणार्या आणि कुठेही जाण्यास प्रतिबंध नसणार्या वासुदेवाचा छत्रपती शिवरायांच्या काळात हेरगिरी, शत्रूची ‘खबर’ पोचवणे, गुप्त माहिती काढणे यांसाठी मोठ्या कौशल्याने वापर केला गेला. मोगल साम्राज्यात संत एकनाथ महाराजांनी ‘वासुदेव समाजाची धर्मप्रचारासाठी सिद्धता करून घेतली आणि मोगल साम्राज्याविरुद्ध धर्मप्रचार करून लढा उभारला’, असाही इतिहास सांगितला जातो. आपल्या शत्रूच्या गोटातून बातम्या मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वासुदेवांचा योग्य वापर करून स्वराज्याच्या अनेक मोहिमा आखल्या होत्या. वासुदेव भोग सोडून त्यागाचे दान मागत आहे. आज शाळेत वासुदेव का आणला जात नाही ? ज्ञानाची आणि दानाची संस्कृती वासुदेवाचे अस्तित्व टिकवू शकते. त्यासाठी भोगवादी परंपरा सोडाव्या लागतील ! हिंदु संस्कृती टिकवायची असेल, तर ‘झोपेतून जागा करणारा’ आमचा वासुदेव हवा आहे; पण आज आपण त्याला विसरलो आहोत. सद्यःस्थितीत वासुदेवाने कधी काय केले ? कुठे केले ? याविषयी कुणाला ठाऊक आहे का ? नाही. कारण आपण वासुदेवाची लोकपरंपरा जपली नाही वा तिचे संवर्धन केली नाही. आज शाळेतून वासुदेव हद्दपार झाला आणि अन्य काल्पनिक पात्रे आत शिरली आहेत. हिंदु धर्माला पोखरणारी अशी एकतर्फी धर्मनिरपेक्षता हिंदूंनी का स्वीकारावी ?
– सौ. अपर्णा जगताप, पुणे.