प्रभु श्रीरामचंद्राविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे बांडगुळ ! – आचार्य प्रल्हाद महाराजशास्त्री

कल्याणजवळील श्रीमलंगगड हरिनाम सप्ताह सोहळ्यात वारकर्‍यांचा आक्रमक निषेध !

कल्याण – श्रीरामचंद्राविषयी आक्षेपार्ह आणि असांप्रदायिक वक्तव्य करणारे समाजातील बांडगुळ आहेत, असे प्रतिपादन या हरिनाम महोत्सवाचे मार्गदर्शक आचार्य प्रल्हाद महाराजशास्त्री यांनी केले. संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव आणि श्रीमलंगगड हरिनाम महोत्सव समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. ‘‘राजकारण आमचा विषय नाही; मात्र आमच्या हृदयात तुम्ही हात घालाल आणि आमच्या अध्यात्मशक्तीला आव्हान द्याल, तर त्याचे उत्तरही तसेच मिळेल. हिंदु समाज शांत बसणार नाही. ऐर्‍या गैर्‍याच्या बोलण्यावर काहीही विचार करू नका, विश्वास ठेवू नका. प्रभु श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहेत’’, अशा शब्दांत ह.भ.प. योगीराज महाराज यांनी या वेळी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठणकावले.

श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहात होत असलेल्या कीर्तन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे उपस्थित होते. सप्ताहाच्या आयोजकांकडूनही जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला.

श्रीराम कंदमुळे खात असल्याचा भावार्थ रामायणात पुरावा ! – पैठण येथील ह.भ.प. योगीराज महाराज 

‘आमच्याकडे संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाचा पुरावा आहे. त्यात संत एकनाथ महाराजांनी असे सांगितले आहे की, जेव्हा प्रभु श्रीरामांना त्यांचे वडील गेल्याचे भरताकडून समजले, तेव्हा वडिलांचे श्राद्ध करण्यासाठी पिंड देण्यात आले. त्या वेळी प्रभु श्रीरामचंद्रांनी सांगितले की, शास्त्राचा नियम असा आहे की, आपण ज्या गोष्टी खातो त्याचेच पिंडदान करावे लागते; मात्र वनवासात आपण अन्न खात नाही, कंदमुळे आणि फळे खाऊन जगतोय. त्यामुळे आपल्याला वडिलांचे श्राद्ध करता येणार नाही’, असे भावार्थ रामायणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, असे पैठण येथील ह.भ.प. योगीराज महाराज यांनी या वेळी सांगितले.