मुंबई, ६ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात बहलोलखान याच्याशी लढतांना प्राण अर्पण करणारे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि अन्य ६ मावळे यांच्या पराक्रमावर आधारित ‘रावरंभा’ हा चित्रपट राज्यातील सर्व शाळांमध्ये दाखवला जाणार आहे. बहलोलखान आणि त्याचे १५ सहस्र सैन्य यांच्याशी युद्ध करणार्या छत्रपती शिवरायांच्या ७ मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास या चित्रपटात चित्रीत करण्यात आला आहे. ७ मावळ्यांचा पराक्रम वर्णन करणारे ‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गीत प्रसिद्ध आहे. वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांत हा चित्रपट शाळांमध्ये दाखवण्यासाठी राज्यशासनाकडून अनुमती देण्यात आली आहे. १० वर्षे वयोगटाच्या पुढील विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवता येणार असून चित्रपट पहाण्यासाठी २० रुपयांपर्यंत शुल्क आकारता येणार आहे. शशिकांत पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.