महाराष्ट्रात मराठी माणसाच्या भूमी काढून घेतल्या जात आहेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई – रायगडमध्ये विमानतळ येत आहे. यानंतर इथे बाहेरच्या राज्यातील लोकांना जागा विकल्या जातील. भूमी काढून घेणे ही महाराष्ट्राविरोधातील सहकार चळवळ आहे. आम्ही मात्र जातीजातीमध्ये भांडत आहोत. हे सर्व राजकीय लाभासाठी, मराठी माणूस एकत्र येऊ नये, यासाठी चालू आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हातून भूमी काढून घेतल्या जात आहेत; मात्र महाराष्ट्र बेसावध आहे, असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड येथे मनसेच्या सहकार मेळाव्यात केले.

या वेळी राज ठाकरे म्हणाले, ‘‘ठाणे, पालघर, रायगड येथे मराठी माणसांच्या भूमी काढून घेण्याचे काम चालू आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात २ लाख २२ सहस्र सहकारी संस्था आहेत. कुठल्याही राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात संस्था नाहीत. महाराष्ट्रात सहकार क्षेत्र चालवण्यासाठी सक्षम माणसे आहेत. इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हातातून सगळे गेले की, आपल्या हाती काही रहाणार नाही. राजकीय लाभासाठी मराठवाड्यात ऊसउत्पादन चालू आहे. ‘त्यामुळे मराठवाड्यात ४०-५० वर्षांत वाळवंट होईल’, असे तज्ञांनी म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्रातील भूमी नष्ट होत आहे.’’