पुणे येथे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्याकडून पोलीस हवालदाराला मारहाण !

भाजपचे आमदार सुनील कांबळे

पुणे – ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय कक्षाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यास मारहाण केली. त्यानंतर शिवाजी सरक या पोलीस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावली. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या कोनशिलेवर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचे नाव नसल्याने ते नाराज होते. ‘उद्घाटन कार्यक्रमाला माझे नाव का नाही टाकले ?’, असे विचारत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांना मारहाण केली होती. नंतर त्यांनी एका पोलीस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावली. त्या वेळी नेमके काय घडले हे समजले नाही.

आमदार कांबळे यांनी दिलेले स्पष्टीकरण !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यास मारहाण केल्याविषयी ते म्हणाले की, मला त्याने तीनवेळा कोपरे मारले; म्हणून मी पोलिसांना सांगितले की, हा कोण आहे ? त्याकडे जरा बघा. तेव्हा पोलिसांनी त्याला मारले, मी उलट त्याला सोडवायला गेलो होतो. पोलीस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावली. यावर स्पष्टीकरण देतांना ते म्हणाले की, मला माहीत नाही, तो कोण होता ? मी खाली उतरतांना माझ्या शर्टाला धरून खेचल्यामुळे मी त्याला धक्का दिला. कोनशिलेवर माझे नाव नाही; म्हणून मी मारहाण करीन, यात तथ्य नाही.