Central Drug Regulatory Board : रक्ताच्या पिशवीसाठी आता केवळ प्रक्रियेवर झालेला खर्चच घेण्यात येणार !

  • केंद्रीय औषध नियामक मंडळाचा निर्णय !

  • पैसे कमावण्यासाठी रक्ताच्या पिशवीची विक्री करता येणार नाही !

नवी देहली – केंद्रीय औषध नियामक मंडळाने (‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने) रक्ताच्या पिशव्या पैसे घेऊन विकण्यावर बंदी घातली आहे. यामुळे आता रक्तपेढ्या किंवा रुग्णालये यांना रक्ताची विक्री करता येणार नाही. रक्ताचा केवळ पुरवठा करता येणार आहे. रुग्णाला रक्त देण्याआधी त्यावर प्रक्रिया करून ते जतन करावे लागते. त्यामुळे रक्ताच्या पिशवीवर केवळ प्रक्रिया मूल्य आकारता येईल, असे मंडळाने परिपत्रकात म्हटले आहे. अनेक खासगी रक्तपेढ्यांकडून रक्ताची विक्री करतांना रुग्णांच्या नातेवाइकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात असल्याचे  निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

१. रक्तदान शिबिरांमधून गोळा करण्यात आलेल्या रक्तामध्ये दात्याच्या शरिरातील इतरही घटक असतात. हे घटक विलग करून लाल पेशी, पांढर्‍या पेशी, प्लेेटलेट्स आणि प्लाझ्मा अशा स्वरूपात हे रक्त शुद्ध केले जाते. त्यानंतर ते योग्य असे तापमान नियंत्रित करून  जतनही केले जाते. या सर्व प्रक्रियेचा खर्च प्रक्रिया खर्चात समाविष्ट होतो; मात्र याव्यतिरिक्त कोणतेही विक्रीमूल्य आकारता येणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

२. केंद्र सरकारकडून वर्ष २०२२ मध्ये प्रसारित करण्यात आलेल्या नियमावलीनुसार रक्तदात्याकडून घेण्यात आलेल्या रक्तावरचा प्रक्रिया खर्च हा १ सहस्र ५५० रुपयांपेक्षा अधिक असू नये. सरकारी रक्तपेढ्यांमध्ये हे मूल्य १ सहस्र १०० रुपयांपर्यंत निश्‍चित करण्यात आले आहे.