गोपनीय बैठकीत उत्तरप्रदेशातील धार्मिक स्थळाविषयी विखारी वक्तव्ये केल्याचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती !
छत्रपती संभाजीनगर – उत्तरप्रदेशातील एका धार्मिक स्थळाविषयी विखारी वक्तव्ये केल्याचा आणि गोपनीय बैठक घेतल्याचा व्हिडिओ तेलंगाणा पोलिसांकडून उत्तरप्रदेश पोलिसांच्या हाती लागताच तेथील आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) छत्रपती संभाजीनगर गाठून ११ संशयितांना नोटीस बजावली आहे. (जी माहिती तेलंगाणा पोलिसांना मिळते, ती महाराष्ट्र पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक) त्यांना १८ जानेवारी या दिवशी लखनौ पोलीस ठाण्यात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी मौन बाळगले आहे.
१. १७ सप्टेंबर २०२३ या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे या संशयितांनी घेतलेल्या गुप्त बैठकीचा व्हिडिओ तेलंगणा पोलिसांच्या हाती लागला होता. त्यात उत्तरप्रदेशातील एका धार्मिक स्थळाविषयी विखारी वक्तव्य केले होते.
२. या प्रकरणी लखनौ ‘ए.टी.एस्.’ने गोमतीनगर पोलीस ठाण्यात ११ ऑक्टोबर २०२३ या दिवशी एकूण १४ संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.
३. त्यांपैकी ११ संशयित छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागातील आहेत. उत्तरप्रदेशमध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर ११ संशयितांना नोटीस बजावण्यासाठी लखनौ ‘ए.टी.एस्.’चे पथक १ जानेवारी या दिवशी शहरात आले होते.
४. उत्तरप्रदेश पोलीस पथकासमवेत महाराष्ट्र ‘ए.टी.एस्.’ने या संशयितांच्या घरी जाऊन नोटिसा बजावल्या आहेत.
५. १ मासापासून उत्तरप्रदेश पोलीस आतंकवादी हालचालींच्या संशयावरून नोटीस बजावत आहेत. महाराष्ट्रात काम करत असलेल्या उत्तरप्रदेशच्या गौंडा जिल्ह्यातील ३ संशयितांना कह्यात घेतले होते, तसेच सहारनपूर आणि देहली येथूनही अनेक संशयितांना ‘ए.टी.एस्.’ने नोटीस बजावल्याचे समजते.