मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश !
नागपूर – ग्रामविकास विभागाने २८ डिसेंबर २०२३ या दिवशी अमरावती जिल्ह्यातील लाखो गुरुदेव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराज यांचे महासमाधी स्थळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
गुरुकुंज आश्रमात थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराजांना स्वातंत्र्यसंग्राम सैनिक म्हणून गौरवले आहे. वर्ष १९५३ मध्ये गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्र्रसंतांनी आश्रम स्थापन केला. हा केवळ आश्रम नसून गुरुदेव भक्तांसाठी ऊर्जास्रोत आहे, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटले होते. राष्ट्र्रसंतांच्या या कार्याला ‘अ’वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी ग्रामविकासमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून केली होती. गुरुकुंज आश्रमाला ‘अ’ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने जगभरातील गुरुदेव भक्तांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. शासनाने या तीर्थक्षेत्राला ‘अ’ दर्जा मिळवून दिल्याविषयी गुरुकुंज आश्रम आणि गुरुभक्त यांनी मंत्री मुनगंटीवार यांचे आभार मानले.