अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर निधी न मिळाल्याचा आरोप !

चंद्रकांत पाटील आणि अजित पवार

पुणे – अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आपल्याला विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केला आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केली असून तसे निवेदन दिले आहे.

अजित पवारांच्या आधी चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असतांना त्यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचा निधी अजित पवारांनी अडवून धरल्याचा या सदस्यांचा आरोप आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी ८०० कोटी रुपयांचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केला आहे. हा ८०० कोटी रुपयांचा निधी तात्काळ रहित करण्यात यावा, अन्यथा न्यायालयात जाऊ, अशी चेतावणी भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी दिली आहे.

अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी सुचवलेल्या कामांच्या याद्यांना मोठ्या प्रमाणावर कात्री लावण्यात आली आहे तसेच अजित पवार त्यांच्या गटातील लोकांना झुकतं माप देत असल्याचा भाजपच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांचा आरोप आहे. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाला नाममात्र फंड उपलब्ध करण्यात आला आहे तसेच अनियमितपणे अजित पवार गटाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कामांचा भरणा करण्यात आलेला आहे, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कामावरून पुणे जिल्ह्यात भाजप, शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.

या गोष्टीच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील आणि जीवन आप्पा कोंडे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा परिषद सी.ई.ओ. यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. आशा बुचके , विजय फुगे, आनंदा नंदे , वासुदेव काळे, कांचन अलंकार,अमोल पांगारे आदी भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी अजित पवारांविरुद्ध तक्रार केली आहे.