देहलीत विरोधकांचा मोर्चा !
नवी देहली – संसदेत झालेल्या आक्रमणाच्या सूत्रावरून विरोधी पक्षांकडून राजकारण केले जात आहे. या आक्रमणाचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी २१ डिसेंबर या दिवशी जुनी संसद ते विजय चौक असा पायी मोर्चा काढला. या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन उत्तर द्यावे. ‘इंडी’ आघाडीच्या खासदारांनी खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात २२ डिसेंबर या दिवशी जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसने सांगितले.
खर्गे पुढे म्हणाले की, पंतप्रधान वाराणसी आणि कर्णावतीला (अहमदाबादला) गेले. ते सगळीकडे बोलतात; पण संसदेच्या सुरक्षेविषयी काहीच बोलत नाही. गृहमंत्री अमित शहा हेही संसदेच्या सुरक्षेसंदर्भात काहीही बोललेले नाहीत. त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारला सभागृहाचे कामकाज चालू द्यायचे नाही. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. संसदेत बोलणे, हा आमचा अधिकार आहे.
बसपच्या प्रमुख मायावती म्हणाल्या की, विरोधी पक्षांच्या खासदारांचे संसदेतून निलंबन करणे योग्य नाही. असे असले, तरी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची केलेली नक्कलही दुर्दैवी आहे.
निलंबित केलेल्या खासदारांची संख्या झाली १४३ !
दुसरीकडे संसदेच्या सुरक्षेत भंग झाल्याच्या सूत्रावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे २० डिसेंबर या दिवशी आणखी २ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत नलंबित केलेल्या खासदारांची संख्या झाली १४३ इतकी झाली आहे. त्यांपैकी १०९ लोकसभेचे, तर ३४ राज्यसभेचे आहेत. २१ डिसेंबरलाही संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. प्रश्नोत्तराच्या तासात काही विरोधी खासदार घोषणाबाजी करतांना दिसले.
संपादकीय भूमिकासंसदेच्या सुरक्षिततेवर सरकारकडून लवकरात लवकर अधिकृत भूमिका मांडणे अपेक्षित असले, तरी त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडून संसदेत केला जाणारा गदारोळ निषेधार्ह आहे. संसदेचा अमूल्य वेळ वाया घालवून जनतेच्या कररूपातील पैशांचा अशा प्रकारे चुराडा होऊ देणार्या अशा लोकप्रतिनिधींना जनता विसरणार नाही, हेही तितकेच खरे ! |