Parliament Mimicry : विरोधकांच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी राज्यसभेत उभे राहून केले कामकाज !

सभापतींची नक्कल केल्याचे प्रकरण

नवी देहली – राज्यसभेत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी २० डिसेंबर या दिवशी उभे राहून कामकाज केले. या संदर्भात ठरावही संमत करण्यात आला. राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेबाहेर नक्कल केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून हा निर्णय घेण्यात आला. सत्ताधारी खासदारांनी घेतलेल्या निर्णयानंतर काही काळ सर्व खासदार जागेवर उभे राहून कामकाजात सहभागी झाले. त्यानंतर मात्र सभापती जगदीश धनखड यांनी सर्वांना बसण्याची विनंती केली. ते म्हणाले, तुम्ही माझ्या सन्मानासाठी जी कृती केली, त्यामुळे माझे मन भरून आले. मी कुणा एकाचे प्रतिनिधित्व करत नाही. मी घटनात्मक पदावर बसलो असून घटनेने दिलेेले दायित्व मला पार पाडायचे आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना मी बसण्याची विनंती करतो आणि कामकाज पुढे चालू ठेवावे, असे निर्देश देतो.

राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी संसदेबाहेर नक्कल करताना

सभापतींच्या नक्कलेच्या घटनेचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘एक्स’वरून निषेध केला आहे.