‘जुने ते सोने’ !

सध्या आधुनिकतेच्या नावाखाली जुन्या शिक्षणप्रणालीला किंवा पद्धतीला बगल देऊन नवी शिक्षणप्रणाली शिक्षणात समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामुळेे पालकांच्या खिशाला कात्री तर लागतेच; परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांची वाटचाल कृत्रिम जीवनमानाकडे होत आहे. परिणामी विद्यार्थी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती याच्यापासून अनभिज्ञ रहात आहेत. उदाहरणार्थ ‘विद्यार्थ्यांना पाटी किंवा वही यांवर लेखणीने अक्षर गिरवायला न शिकवता त्यांना ‘टॅबलेट’, संगणक आदी डिजिटल उपकरणांवर शिक्षण दिल्यामुळे मुलांचे मूलभूत कौशल्य न्यून होत आहे’, असे संशोधन स्वीडनमधील तज्ञांनी केले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शिक्षणप्रणालीमध्ये पालट करायला आरंभ केला आहे. स्वीडनची शैक्षणिक गुणवत्ता युरोपियन देशांच्या तुलनेत उच्च दर्जाची आहे; परंतु ४ थ्या इयत्तेपर्यंतच्या मुलांची शिकण्याची पातळी वर्ष २०१६ ते २०२१ या काळात पुष्कळ घसरली आहे, असे त्यांच्या निदर्शनास आल्यावर स्वीडनच्या शिक्षण मंत्रालयाने लहान मुलांसाठी डिजिटल शिक्षण पूर्णपणे बंद करून त्यांना पारंपरिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे !

‘टॅबलेट’चा वापर चालू झाल्यामुळे मुलांचे हाताने लिहिणे बंद झाले. त्यामुळे त्यांची हानी होत आहे. हाच पालट भारतामधील शिक्षणसंस्थांनीही करणे अपेक्षित आहे. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा आपली पूर्वीची शिक्षणपद्धत कशी उपयुक्त आहे ? हे लक्षात घेतले पाहिजे. पूर्वी वर्गामध्ये मस्ती केली किंवा गृहपाठ केला नाही, तर शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षा करायचे. त्या शिक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चुकीची खंत त्यांच्या मनात निर्माण व्हायची. हातावर छडी बसल्यामुळे अभ्यासाप्रती त्यांच्या मनात गांभीर्य निर्माण व्हायचे. ‘छडी लागे छमछम विद्या येई घमघम’, असे म्हटले जाते, ते यासाठीच ! मोठे झाल्यावर विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी नितांत आदर वाटतो; पण आता शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर असा ‘प्रेमाचा’ अधिकार राहिला नाही. पालकही विद्यार्थ्यांप्रती अतीसंवेदनशील झाले आहेत. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचे दायित्व वाटत नाही. आपल्या शाळेत येणार्‍या विद्यार्थ्याचा अंतर्बाह्य विकास होऊन तो या राष्ट्राचा आदर्श नागरिक कसा होईल ? याचे दायित्व शिक्षक आणि शाळा यांनी घ्यायला हवे. त्यामुळे उद्याची पिढी घडून भारत खर्‍या अर्थाने पुढे जाईल. ‘डिजिटल भारत’ या संज्ञेच्या नावाखाली आपण आपली पाळेमुळे तर हरवत नाही ना ? याचा विचार गांभीर्याने होणे आवश्यक आहे. येथे ‘जुने ते सोने’ हे लक्षात घ्यावे !

– श्री. जयेश बोरसे, पुणे