पात्रमपात्रीकुरुते दहति गुणान्स्नेहमाशु नाशयति।
अमले मलं प्रयच्छति दीपज्वालेव खलमैत्री॥
अर्थ : दिव्याची ज्वाला चांगले भांडे काळे करते, वात जाळते, तेलाचा त्वरित नाश करते आणि शुद्ध आहे ते मलिन करते. तशी दुर्जनाची मैत्री असते.
दुर्जनापेक्षा दुर्जनाची संगत अधिक अपायकारक असणे !
अहो दुर्जनसंसर्गात् मानहानिः पदे पदे।
पावको लोहसंगेन मुद्गैरैरभिताड्यते॥
अर्थ : दुर्जनाच्या संगतीने किती मानहानी होते ! अग्नीसुद्धा लोखंडाच्या संगतीमुळे हातोड्याने बडवला जातो. मूळ अग्नि हा अतीशुद्ध आहे; पण ज्या वेळी तो भट्टीमध्ये लोखंडाच्या संपर्कात येतो, त्या वेळी लोहाराचे घण त्याच्यावरही पडतात. त्याप्रमाणे दुष्टांच्या संगतीत सापडलेल्या सज्जनाला पदोपदी मानहानी सहन करावी लागते.
दुर्जनाच्या अनुभवाने माणसाचा सज्जनावरचा विश्वास उडतो !
दुर्जनदूषितमनसां पुंसां सुजनेऽपि नास्ति विश्वासः।
दुग्धेन दग्धवदनस्तक्रं फूत्कृत्य पामरः पिबति॥
अर्थ : दुर्जनाच्या अनुभवाने माणसाचे मन दूषित झाले की, त्याचा सज्जनावरचा विश्वाससुद्धा उडतो. दुधाने तोंड पोळले की, माणूस ताकसुद्धा फुंकून पितो.