Ayodhya Temple : श्रीराममंदिरात स्थापित होणार १ किलो सोने आणि ७ किलो चांदी यांपासून बनवलेल्या पादुका !

कर्णावती/अयोध्या – अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मंदिराच्या प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला आता अवघा एक महिनाच शेष राहिला असून सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. अशातच २२ जानेवारी २०२४ या दिवशी मंदिरात अभिषेक झाल्यानंतर तेथे श्रीरामाच्या चरण पादुकाही स्थापित करण्यात येणार आहेत. या चरण पादुका १ किलो सोने आणि ७ किलो चांदी यांपासून बनवण्यात आल्या आहेत.

भाग्यनगरचे श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी या चरणपादुका बनवल्या असून सध्या या पादुकांची देशभर मिरवणूक काढली जात आहे. १७ डिसेंबर या दिवशी त्या रामेश्‍वर धाम येथून कर्णावतीत आणण्यात आल्या. तेथून त्या सोमनाथ ज्योतिर्लिंग धाम, द्वारकाधीशनगरी आणि नंतर बद्रीनाथ धाम येथे नेल्या जातील. श्रीचल श्रीनिवास यांनी या पादुका हातात घेऊन ४१ दिवस अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिराची प्रदक्षिणाही केली आहे.

असे चालू आहे मंदिराच्या उभारणीचे काम !

  • अयोध्येतील राममंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.  दगडी फरशी आणि खांब यांचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
  • डिसेंबरच्या शेवटी पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे राम मंदिर न्यासाने सांगितले आहे.
  • बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी राम मंदिर संकुलातील मजुरांची संख्या ३ सहस्र २०० वरून ३ सहस्र ५०० करण्यात आली आहे.
  • छतावर कोरीव काम चालू आहे, तर तळमजल्यावरील १८ पैकी १४ दरवाज्यांना सोन्याचा मुलामा चढवला जात आहे.
  • मंदिर उभारणीच्या ठिकाणी अतीमहनीय व्यक्तींच्या हालचालींवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. मंदिर उभारणीची गती कोणत्याही व्यत्ययाखेरीज चालू रहावी, हा यामागील उद्देश आहे.