विद्यार्थ्याने ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी’ आणि ‘जय शिवाजी’ लिहिलेला कागद फाडून कचर्‍याच्या डब्यात फेकला !

  • कल्याण येथील सेंट थॉमस शाळेतील शिक्षिकेचे हिंदुद्रोही कृत्य ! 

  • पालक आणि नागरिक यांनी खडसावल्यावर शिक्षिकेने मागितली क्षमा !

कल्याण (पूर्व) येथील विजयनगर भागातील सेंट थॉमस शाळा

 

ठाणे, १० डिसेंबर (वार्ता.) – कल्याण (पूर्व) येथील विजयनगर भागातील सेंट थॉमस शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याने ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी’ आणि ‘जय शिवाजी’ असे लिहिलेला कागद फाडून कचर्‍याच्या डब्यात टाकला. ‘पुन्हा असे कृत्य केल्यास शाळेतून काढून टाकू’, अशी धमकीही विद्यार्थ्याला शिक्षिकेने दिली. यावर विद्यार्थ्याचे पालक आणि नागरिक यांनी शिक्षिकेला खडसावले आणि केलेल्या कृत्याविषयी क्षमा मागायला लावली. (असे दक्ष पालक आणि नागरिक हेच हिंदु धर्माची खरी शक्ती होत ! – संपादक)

१. इयत्ता १० वीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने घडलेला प्रकार त्याच्या पालकांना सांगितला. पालकांनी राष्ट्र कल्याण पक्षाचे सरचिटणीस राहुल काटकर यांच्याशी संपर्क साधून याविषयी कळवले.

२. ९ डिसेंबरला सकाळी राहुल काटकर आणि त्यांचे सहकारी मयुरेश धुमाळ, राहुल महाजन, शरद पाटील यांच्यासह अनेक समाजसेवक शाळेत एकत्र आले. (कृतीशील झालेल्या सर्व धर्मप्रेमींचे अभिनंदन ! – संपादक)

३. यानंतर त्यांनी शिक्षिकेला खडसावले. त्या वेळी शिक्षिकेने केलेल्या कृत्याविषयी माफी मागितली, तसेच लेखी माफी मागणार असल्याचे आश्‍वासन दिले.

४. राहुल काटकर यांनी आणलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र शाळेतील पाद्य्राने शाळेच्या भिंतीवर लावले आणि त्या चित्राला हार घातला. हे सर्व प्रकरण समजल्यावर कोळसेवाडी पोलीस शाळेत पोचले.