शालेय पोषण आहार योजनेत अंड्यांचा समावेश करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध !

डावीकडून १. ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, २. आचार्य तुषार भोसले आणि ३. श्री. सुनील घनवट

आळंदी – ७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी शासनाने एक परिपत्रक काढले आहे. यानुसार ‘पंतप्रधान पोषण आहार योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंड्यांचा समावेश केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, महानुभव संप्रदाय, जैन संप्रदाय, तसेच विविध आध्यात्मिक संप्रदायांचे भाविक दु:खी झाले आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला भाजप आध्यात्मिक आघाडीचा विरोध आहे. या संदर्भात आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती ‘भाजप आध्यात्मिक आघाडी’चे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ९ डिसेंबर या दिवशी ‘फ्रुटवाले धर्मशाळा’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी आध्यात्मिक आघाडीचे सहसंयोजक ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. संजयनाना धोंगडे, कोकण विभाग संयोजक ह.भ.प. मोहन महाराज म्हात्रे, पश्‍चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज घुंडरे, ‘फ्रुटवाले’ धर्मशाळेचे अध्यक्ष श्री. भगवानशेठ थोरात, व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. रंजनशेठ जाधव, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. राम गावडे, हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, आळंदी युवा मोर्चाचे श्री. आकाश जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आचार्य तुषार भोसले पुढे म्हणाले, ‘‘गंगा नदी शुद्ध करण्यासाठी ज्याप्रकारे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचप्रकारे आळंदी येथील इंद्रायणी आणि पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. यासाठी ‘अमृत २.० योजना संमत’ करण्यात आली आहे. यात पुणे महानगरपालिकेच्या वतीने ५५० कोटी आणि आळंदी नगरपालिकेच्या वतीने८० कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. या योजनेस राज्यशासनाने संमती दिली असून लवकरच केंद्रशासनाचीही संमती मिळेल. यानंतर नदी स्वच्छतेचे काम तात्काळ चालू होईल, अशी आम्हाला आशा आहे.

२० डिसेंबरपर्यंत सरकारने निर्णय मागे घ्यावा ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

आपण युवा पिढी संस्कारीत झाली पाहिजे आणि ती पुढे जाऊन राष्ट्राचा आधार बनली पाहिजे, असे म्हणतो; मात्र अंड्यासारखा आहार दिल्याने युवकांच्या विचारांची दिशा पालटू शकते. हा आहार मांसाहाराकडे आणि पुढे ‘नको त्या पेयाकडे’ नेणारा आहे. या निर्णयास वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध असून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी दुसरा आहार द्यावा. शासन विद्यार्थ्यांना काजू-बदाम, शेंगदाणा-गुळ, असा सात्त्विक आहार देऊ शकते. हा निर्णय शासनाने २० डिसेंबरअखेर मागे घ्यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू, अशी चेतावणी ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी या प्रसंगी दिली.

कानिफनाथ देवस्थान प्रकरणी हिंदु भाविकांवर आक्रमण करणार्‍यांवर शासनाच्या वतीने कठोर कारवाईचे आश्‍वासन ! – आचार्य तुषार भोसले

आचार्य तुषार भोसले

कानिफनाथ देवस्थान (जिल्हा अहिल्यानगर) येथे झालेली घटना अत्यंत दुदैवी आहे. या संदर्भात आमची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या संदर्भात वारकरी बांधवांना ज्यांनी मारहाण केली, त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन गृहमंत्र्यांनी दिले आहे.

विद्यार्थ्यांना आहारात सात्त्विक पदार्थ द्यावा ! – सुनील घनवट

या प्रसंगी श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘आपण जो पदार्थ खातो त्याचा संस्कार मनावर होत असल्याने विद्यार्थ्यांना आहारात सात्त्विक पदार्थ देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याचा पुनर्विचार करून सात्त्विक आहाराचा समावेश त्यात करावा.’’