बाळ्ळी येथे ‘बालरथ’ उलटला : २४ विद्यार्थी घायाळ

मडगाव, ७ डिसेंबर (वार्ता.) – कुंकळ्ळी येथील कुंकळ्ळी युनायटेड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ‘बालरथ’ ७ डिसेंबर या दिवशी सकाळी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. ‘बालरथ’मधील ३४ पैकी ४ विद्यार्थी गंभीररित्या घायाळ झाले आहेत, तर २१ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले आहे.

सौजन्य प्राइम मीडिया गोवा 

सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शाळेची बस बाळ्ळी येथे गेली होती. विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत येत असतांना बाळ्ळी आरोग्य केंद्राजवळ अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला खाईत कलंडली. दैव बलवत्तर म्हणून विद्यार्थी थोडक्यात वाचले. घटनेचे वृत्त समजतात परिसरात हाहाकार उडाला. अपघातानंतर घटनास्थळी अनेक जण पोचले. मुलांना बसमधून बाहेर काढण्यात आले; मात्र त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने तातडीने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. ३ विद्यार्थ्यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कुंकळ्ळी पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधत आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी रुग्णालयात भेट देऊन घायाळ झालेल्या मुलांची विचारपूस केली. सरकारच्या निष्काळजीपणामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला असून राज्यातील सर्व ‘बालरथ’ बसगाड्यांचे ‘ऑडिट’ होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

या अपघातातील ‘बालरथ’चा चालक वेळीप यालाही उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. चालकाच्या म्हणण्यानुसार अचानकपणे गाडीचे ‘स्टिअरिंग’ फिरणे बंद झाल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

बाळ्ळी येथील अपघाताचे सखोल अन्वेषण होणार !  मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

बाळ्ळी येथे ‘बालरथा’ला झालेल्या अपघाताचे वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते (रस्ता अभियांत्रिकी) आणि शिक्षण खाते यांना सखोल अन्वेषण करून त्याचा अहवाल सरकारला सुपुर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा घटना यापुढे टाळण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. ‘बालरथ’ बसची डागडुजी (मेंटेनन्स) करण्याचे दायित्व हे शाळेच्या व्यवस्थापनाचे आहे. सरकार यासाठीच संबंधित शाळेला अनुदान देत असते.