Goa Pollution : गोव्यातील ११ ठिकाणी सर्वाधिक वायूप्रदूषण !

(विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

पणजी, ६ डिसेंबर (वार्ता.) : राज्यातील १८ पैकी ११ ठिकाणी सर्वाधिक वायूप्रदूषण होत असून कुंकळ्ळी, कुंडई आणि पणजी ही ३ ठिकाणे आघाडीवर आहेत, असे राज्य प्रदूषण मंडळाने घोषित केलेल्या वर्ष २०२३ च्या अहवालातून समोर आले आहे.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार १८ ठिकाणी वायूप्रदूषणाचे मोजमाप करण्यात आले होते. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातील ६, खाण क्षेत्रातील ८, तर औद्योगिक वसाहतीतील ४ ठिकाणांचा समावेश होता. १८ पैकी ११ ठिकाणी ‘पी.एम्. १०’ (१० मायक्रॉन किंवा त्यापेक्षा अल्प व्यास असणार्‍या प्रदूषण कणांना ‘पी.एम्. १०’ असे म्हटले जाते.) यामध्ये बुरशी, धातू, धूळ, धूर यांच्या सूक्ष्म कणांचा समावेश असतो. या कणांचे हवेतील प्रमाण वाढल्यास डोळे, नाक, घसा, तसेच फुफ्फुस यांना त्रास होऊ शकतो. या घातक प्रदूषण कणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आहे. हवेतील या कणांची वार्षिक सरासरी ६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर ठरवलेली आहे. त्यानुसार कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत वार्षिक ‘पी.एम्. १०’ प्रदूषण कणांचे प्रमाण सर्वाधिक ७२, कुंडई औद्योगिक वसाहतीत ७०, पणजी येथे ६८, आमोणा ६७, मुरगाव ६७, अस्नोडा ६६, तुये ६६, उसगाव ६३, होंडा ६२, कोडली-दाभाळ ६२ आणि सांगे ६१ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर आहे. यापुढे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यभरात ३९ ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करणार आहे.