गळती शोधण्यासाठी पंजाबमधून श्वानपथकाला पाचारण
पणजी, ६ डिसेंबर (वार्ता.) : माटवे, दाबोळी येथील इंधन गळतीचे मूळ शोधण्याचे प्रयत्न गेल्या १० दिवसांपासून चालू आहे. विहीर आणि नाले यांच्यानंतर आता इंधन शेत आणि भाट (नारळाची बागायत) यांच्यामध्ये पाझरू लागले आहे. यामुळे येथील रहिवाशांची भीती आणखीनच वाढली आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘झुआरी इंडियन ऑईल टँकींग प्रा.लि.’ आस्थापनाने इंधन गळती शोधण्यासाठी यंत्राचे साहाय्य घेऊनही लाभ झालेला नसल्याने आता पंजाब येथील श्वानपथक पाचारण केले आहे.
(सौजन्य : News Matters)
माटवे, दाबोळी येथे प्रथम एका विहिरीमध्ये इंधनाचा मोठा थर दिसल्याने तेथील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली. प्रारंभी ८ दिवस ही गळती कुठून होते, हे शोधून काढण्याचे काम ‘झुआरी इंडियन ऑईल टँकींग प्रा.लि.’ आस्थापनाने केले. यासाठी प्रारंभी खोदकाम करण्यात आले आणि नंतर गोव्याबाहेरून तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले; मात्र गळतीचा स्रोत सापडू शकलेला नाही. इंधन गळतीनंतर येथील विहिरीचे पाणी प्रदूषित झाले. त्या विहिरीतून सुमारे ४०-४५ टँकर इंधनमिश्रित पाणी काढण्यात आले आहे. विहिरीनंतर गेल्या २ दिवसांपासून तेथील नाल्यांमध्ये इंधन वाहू लागले आहे. आता नाल्यांनंतर शेत आणि भाट यांमध्ये इंधन पाझरू लागले आहे. ‘झुआरी इंडियन ऑईल टँकींग प्रा.लि.’ आस्थापनाच्या व्यवस्थापनाच्या मते आस्थापनाने २२ नोव्हेंबरपासून ‘पाईपलाईन’मधून इंधन पंपिंग करणे बंद केले आहे आणि जोपर्यंत गळती पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत अशीच स्थिती असेल.
‘झुआरी इंडियन ऑईल टँकींग प्रा.लि.’वर कारवाई करा ! – विरोधी पक्ष
माटवे, दाबोळी येथे इंधनगळतीला उत्तरदायी असलेल्या ‘झुआरी इंडियन ऑईल टँकींग प्रा.लि.’वर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.
गोव्यात वाहनांसाठी इंधनाच्या टंचाईची शक्यता
माटवे, दाबोळी येथे इंधनगळतीमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. गळती होत असल्याने नौकांवरील इंधन ‘झुआरी इंडियन ऑईल टँकींग प्रा.लि.’ आस्थापनाच्या सांकवाळ पठारावर उभारण्यात आलेल्या टाक्यांमध्ये भरणे बंद करण्यात आले आहे. टाक्यांमध्ये इंधनाचा साठा पुष्कळ अल्प राहिलेला आहे. मुरगाव बंदरात आलेल्या इंधनवाहू नौकांतील इंधन गेल्या ८ दिवसांपासून टाक्यांमध्ये भरण्यात आलेले नाही. याचा परिणाम म्हणून गोव्यात वाहनांसाठी इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.