आस्थापने आणि दुकाने यांच्या पाट्या मराठीत लावण्याची पुणे महानगरपालिकेची नोटीस !

पुणे – १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरामधील सर्व प्रकारची दुकाने, आस्थापने यांना ‘नामफलक’ (पाट्या) मराठीमध्ये लावण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेने दिले आहेत. नामफलकावर नावे ठळक मराठी अक्षरांमध्ये लिहावीत आणि इतर भाषेतील अक्षरे लहान असावीत. या आदेशाची कार्यवाही न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, तसेच ज्या ठिकाणी मद्य विक्री केली जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्ती आणि गड यांची नावे देण्यासही बंदी केली आहे. ‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशन’ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने २ मासांमध्ये दुकानांवर मराठी अक्षरांमध्ये नामफलक लावावेत, असे आदेश दिले आहेत.

‘मनसे’ने जंगली महाराज रस्त्यावरील आस्थापनांचे इंग्रजी नामफलक फोडले !

पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर १ डिसेंबर या दिवशी ‘मनसे’च्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी इंग्रजी भाषेमध्ये असलेल्या नामफलकांची तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी तातडीने पोलीस आले. आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली. पोलिसांनी ‘मनसे’चे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह ७ ते ८ जणांना कह्यात घेतले आहे.