१. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळी जाणवलेली सूत्रे
‘११.५.२०२३ या दिवशी सकाळी ९ वाजता भगवंताच्या कृपेने मला सेवेकरीता ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी जाण्याचा योग आला. त्या वेळी मला पुढील सूत्रे जाणवली.
अ. ब्रह्मोत्सवाचे ठिकाण देवलोक असून सर्व देवता सूक्ष्मातून तिथे पहाटेपासूनच उपस्थित होत्या.
आ. ब्रह्मोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी ऋषिमुनी यज्ञयाग करत होते. यज्ञ होत असतांना गंध आणि धूप यांचा सुगंध आला अन् धूर मला उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसला.
इ. दैवी वाहने, उदा. हत्ती, सिंह आणि वाघ यांचाही वावर ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी स्पष्टपणे जाणवला. त्या वेळी पृथ्वी आणि आकाश यांच्या पलीकडे चैतन्य पसरले होते.
२. दुपारी सर्व साधक ब्रह्मोत्सवाच्या दिशेने येत असतांना ‘देवच सर्व साधकांचे स्वागत करत आहे. दैवी वाद्ये वाजत आहेत आणि साधकांवर फुलांचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवले.
३. दुपारी साडेचार वाजता आलेल्या अनुभूती
अ. ‘साक्षात् विष्णुही ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी प्रकट झाला आहे आणि त्याच्यावर अन् ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या देवलोकावर आकाशातून साक्षात् देवता पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला दिसले. त्या वेळी माझ्या संपूर्ण शरिरावर रोमांच येऊन माझी भावजागृती झाली.
आ. साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली वेळेच्या पूर्वीच त्या ठिकाणी आली होती. तिच्या समवेत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याही उपस्थित होत्या.
इ. रथामध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे सर्व साधकांना दर्शन झाले. त्या वेळी ‘ते दर्शन ब्रह्मांडातील सर्व देवतांना होत आहे’, असे मला वाटले आणि माझा उर अतिशय भरून आला अन् माझा भाव जागृत झाला.
ई. रथाची परिक्रमा चालू झाली. तेव्हा त्या परिक्रमेत देवता वाद्यांसहित प्रत्यक्षात सहभागी झाल्या होत्या आणि गंध-पुष्प यांचा वर्षाव त्या रथावर करत होत्या.
उ. सूर्यदेवतेने तिचा उष्मा गुरुमाऊलीच्या साधकांकरता अल्प केला होता.
ऊ. रथाच्या माध्यमातून पृथ्वीतलावर सर्वत्र पांढर्या, पिवळ्या, लाल आणि निळ्या रंगांमध्ये चैतन्य पसरत होते.
ए. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली यांचे दर्शन सर्व साधकांना झाले. तेव्हा सर्व देवता गुरुमाऊलीची आरती करत होत्या. ढोल, मृदुंग, शंख आणि वीणा यांचा नाद स्पष्टपणे ऐकू येत होता. त्या ठिकाणी साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली सर्व ब्रह्मांडाला आश्वस्त करत होती, ‘मी श्रीविष्णु रूपामध्ये प्रकट झालो आहे. या रथामध्ये मी आज आरूढ झालो आहे. हिंदु राष्ट्राच्या दिशेने हा रथ वेगाने मार्गक्रमण करत आहे.’
४. ‘रथाचे मार्गक्रमण साधकांच्या दिशेने होतांना दिव्य रथामध्ये तिन्ही गुरु सर्व साधकांना नमस्कार मुद्रेमध्ये दृष्टीक्षेपाच्या माध्यमातून चैतन्यशक्ती प्रदान करत आहेत’, अशी अनुभूती आली.
५. ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीच्या चरणी जी नृत्यसेवा अर्पण झाली, ती पहातांना संपूर्ण शरिरावर रोमांच येऊन भावजागृती झाली.
६. ‘न भूतो न भविष्यति ।’ अशी नृत्यसेवा करण्यासाठी देव आणि गंधर्वही आतुरलेले असल्याचे जाणवणे
‘न भूतो न भविष्यति ।’ घडत होते. सर्वत्र सुगंध येत होता. त्या वेळी नृत्य सेवा करणार्या प्रत्येक साधिकेच्या भोवती त्यांच्या भावाप्रमाणे वलये स्पष्टपणे दिसत होती. नृत्यसेवा दिव्यलोकात चालू होती आणि साक्षात् विष्णुसमोर चालू असलेली सेवा पहाण्यासाठी सर्व देवता अवकाशातून प्रत्यक्ष पृथ्वीतलावर अवतरित झाल्या होत्या. देव आणि गंधर्व हे सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्ष आले होते आणि ते ती सेवा करण्यासाठी आतुरले होते. ही संधी गुरुमाऊलीनी काही साधिकांना दिली होती. त्यामुळे त्यांचाही कृतज्ञताभाव जागृत झाला होता.
गुरुमाऊलींच्या कृपेमुळे मला हे सर्व अनुभवता आले. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– अधिवक्ता नीलेश सांगोलकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के , वय ३८ वर्षे), पंढरपूर. (६.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |