|
बीजिंग (चीन) – भारत त्याच्या नौदलाची शक्ती वृद्धींगत करण्यासाठी दुसरी विमानवाहू युद्धनौका बनवणार आहे. यावरून चीनचे पित्त खवळले असून चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने भारताच्या विरोधात विषवमन केले आहे. ‘कागदी ड्रॅगन’ असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले की, भारत कथित रूपाने चीनशी स्पर्धा करण्यासाठी त्याची दुसरी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका बनवण्याची सिद्धता करत आहे. विविध चिनी सैन्य विश्लेषकांचा हवाला देत यात म्हटले की, स्वत: विमानवाहू युद्धनौका बनवण्यास सक्षम होणे ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे. असे असले, तरी भारताने चीनची स्पर्धा करणे हे त्याची ‘सुरुंग दृष्टी’ दर्शवते. भारताच्या ‘संरक्षण अधिग्रहण परिषदे’कडून त्याच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेच्या अधिग्रहणाला स्वीकृती मिळण्याची शक्यता आहे. याची किंमत तब्बल ४.८ बिलियन डॉलर (४० सहस्र कोटी रुपये) आहे.
सौजन्य न्यूज नेशन
(म्हणे) ‘जोपर्यंत भारत चीनला उकसवणार नाही, तोपर्यंत चीन भारताचा शत्रू नाही !’ – चीनची दर्पोक्ती
१. ग्लोबल टाइम्सने पुढे म्हटले की, भारत विमानवाहू युद्धनौका बनवून त्याच्या नौदलाला विकसित करू शकतो; परंतु जर त्याची रणनीती चीनकेंद्रित असेल, तर त्याला विरोध करू. चीन राष्ट्रीय संरक्षण नीतीचा अंगीकार करतो, जी संरक्षणात्मक आहे. त्यामुळे जोपर्यंत भारत चीनला चिथावणार नाही, तोपर्यंत चीन भारताचा शत्रू नाही.
२. हिंद महासागरात चिनी नौदलाच्या उपस्थितीच्या संदर्भात चीनने म्हटले की, आमची उपस्थिती भारतावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नाही. आमचा उद्देश हा शांतीपूर्ण आहे. समुद्री मार्गांचे रक्षण आणि मानवीय साहाय्य पोचवणे हा आमचा उद्देश आहे. याचा भारतालाही लाभ होतो.
३. चीनने भारताच्या प्रस्तावित विमानवाहू युद्धनौकेची तुलना तिच्या नव्या विमानवाहू युद्धनौका ‘फुजियान’शी केली असून त्याने म्हटले की, ‘फुजियान’ ही दुसरी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका असून ती जून २०२२ मध्येच तैनात करण्यात आली आहे. ती ८० सहस्र टन पाण्याचे विस्थापन करते. फुजियानमध्ये ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट’ नावाची यंत्रणा असून या यंत्रणेद्वारे या नौकेवरून मोठ्या लढाऊ विमानांची उड्डाणे करणे शक्य होते. भारताच्या विमानवाहू युद्धनौकामध्ये हे अत्याधुनिक तंत्रज्ञान नसून फुजियान त्यापेक्षा पुष्कळ चांगले कार्य करू शकते.
भारताच्या प्रस्तावित विमानवाहक जहाजाची क्षमता !भारताच्या प्रस्तावित विमानवाहू युद्धनौकेवरून फ्रान्सच्या ‘राफेल’ या लढाऊ विमानासहित किमान २८ लढाऊ जेट आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यास ती सक्षम असेल, असा अनुमान आहे. ही विमानवाहू युद्धनौका ४५ सहस्र टन पाण्याचे विस्थापन करते. |
४. ‘ग्लोबल टाइम्स’ने शेखी मिरवत म्हटले की, भारताचे पहिले विमानवाहक जहाज ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ आमच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहक जहाज ‘शेडोंग’च्या परिचालन क्षमतेपर्यंत पोचू शकले नाही. खरेतर विक्रांतची उभारणी शेडोंगपेक्षा पुष्कळ आधी चालू झाली होते. शेडोंगने या वर्षी पश्चिम प्रशांत क्षेत्रामधील अनेक सुदूर समुद्री अभ्यासांत स्वत:च्या लढाऊ क्षमतांचे प्रदर्शन घडवले. असे असले, तरी ‘ग्लोबल टाइम्स’ने ‘चीनने त्याचे पहिले विमानवाहक जहाज युक्रेनचे भंगार विकत घेऊन आणि रशियाचे तंत्रज्ञान चोरून विकसित केले’, हे सोयीस्कररित्या विसरला.
संपादकीय भूमिका‘एखाद्या देशाच्या उदयामुळे आपल्यावर संकट ओढवू शकते’, या भयाने त्याच्याशी तुलना करून त्याला हीन लेखण्याचा प्रयत्न केला जातो, असे मानसशास्त्र सांगते. चीनचाही हा केविलवाणा प्रयत्न तो भारतभयाने ग्रस्त झाला आहे, हेच लक्षात आणून देते ! |