सहस्र टँकर भाड्याने घेऊन मुंबई धुण्याचे आदेश
मुंबई – मुंबईत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका उपाययोजना काढत आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यकता भासल्यास दुबईतील आस्थापनाशी संपर्क करून कृत्रिम पाऊस पाडू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ते स्वतः आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल उपस्थित होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ‘‘मी महापालिकेच्या उपाययोजनांची पहाणी केली. रस्ते धुतले जात आहेत. माती काढली जात आहे. पाण्याची फवारणी होत आहे. सहस्र टँकर भाड्याने घेऊन मुंबई धुण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी सहकार्य करावे. मुंबईतील बागांमध्ये अधिकाधिक वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.’’