पोलीस दल कि वासनांधांचा अड्डा ?

संपादकीय

निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर

निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी एका मुलाखतीत त्‍यांना पुरुष पोलिसांकडून आलेल्‍या अनुभवांचे केलेले कथन ज्‍यांनी ऐकले असेल, त्‍या सर्वांचा, विशेषतः महिलांचा पोलिसांवरील उरला-सुरला विश्‍वास पूर्णपणे उडून गेला असेल. बोरवणकर यांनी ‘एका विवाहित पोलीस अधिकार्‍याने मला एकत्र रहाण्‍याविषयी विचारणा केली होती, तर अन्‍य एका वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍याने ‘तुम्‍ही रागावल्‍यावर फार सुंदर दिसता’, अशी टिपणी केली होती’, अशी माहिती दिली. एवढेच नाही, तर बोरवणकर यांनी याविरुद्ध आवाज उठवल्‍याने त्‍यांचे अधिकारच काढून घेण्‍यात आले. या गोष्‍टी खरोखरच चीड आणणार्‍या आहेत.

पोलीस ज्‍या गुन्‍ह्यांसाठी गुन्‍हेगारांना पकडतात, तेच गुन्‍हे जर खाकी वेशातील पोलिसांची टोळी करू लागली, तर अराजकतेखेरीज दुसरे काय निर्माण होणार ? आतापर्यंतच्‍या अनेक घटनांवरून पोलिसांमध्‍ये गुंड, दरोडेखोर, भ्रष्‍टाचारी, बलात्‍कारी, वासनांध अशा सर्वांचाच भरणा असल्‍याचे उघड झाले. हे चित्र महाराष्‍ट्राला अत्‍यंत लज्‍जास्‍पद आहे. एका महिला पोलीस अधिकार्‍याशी अश्‍लील वर्तन करून वर त्‍यांचाच आवाज दाबला जात असेल, तर सर्वसामान्‍य महिलांची काय स्‍थिती असेल ? त्‍या किती सुरक्षित असतील ?, हा प्रश्‍नच आहे.

याविरुद्ध आता जनतेनेच आवाज उठवला पाहिजे. स्‍वतःच्‍या बेहिशोबी मालमत्तेविरुद्ध कारवाई करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयावर वाटेल त्‍या शब्‍दांत टीका करणारे राजकीय पक्षही आता अशा वासनांध पोलिसांविषयी चकार शब्‍दही काढत नाहीत. हे चित्र पालटण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे. यासाठी अशा दोषींना आजन्‍म कारागृहात टाकण्‍याची आवश्‍यकता आहे. जाता जाता बोरवणकर यांनी ‘महिला उच्‍च पदावर असूनही आणि पन्‍नाशी ओलांडूनही त्‍यांच्‍यावर वाईट प्रसंग ओढवू शकतात’, असे सांगितले. हे एक निवृत्त महिला पोलीस अधिकारी म्‍हणते, यापेक्षा भयंकर स्‍थिती ती कुठली ? यासाठी आता महिलांनीच स्‍वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्‍वतःचे रक्षण स्‍वतःच करण्‍यासाठी सिद्ध झाले पाहिजे आणि सरकारने हा ‘वासनांधांचा अड्डा’ नष्‍ट करून कर्तव्‍यदक्ष पोलिसांची नेमणूक केली पाहिजे. यातच समाजहित आहे !

महिलांना पोलीस दलातील वासनांधांकडून धोका असणे, हे महाराष्‍ट्राला अत्‍यंत लज्‍जास्‍पद !