भाव-भावनांतील दुजाभाव !

संपादकीय

क्रिकेटसारख्‍या निरर्थक खेळासाठी या भाव-भावनांची ऊर्जा खर्ची घालायची का ?

भाव-भावना हा मनाच्‍या कार्याचा अविभाज्‍य भाग आहे. कुठल्‍याही गोष्‍टीविषयी मनात उमटणार्‍या संवेदना किंवा येणारे विचार, म्‍हणजे भाव-भावना ! या भाव-भावनांचे जेव्‍हा सामूहिक प्रकटीकरण होते, तेव्‍हा त्‍यांना राष्‍ट्रीय किंवा सामाजिक स्‍वरूप प्राप्‍त होते. नुकत्‍याच झालेल्‍या विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यात आपण सर्वांनी त्‍या अनुभवल्‍या. अर्थात् क्रिकेटसारख्‍या निरर्थक खेळासाठी या भाव-भावनांची ऊर्जा खर्ची घालायची का ? हा एका वेगळ्‍या लेखाचा विषय आहे. तथापि त्‍या जेथे व्‍यक्‍त व्‍हायला हव्‍यात, तेथे होतांना सहसा दिसत नाहीत. सध्‍या उत्तरकाशी येथे एका बोगद्यात अडकलेल्‍या ४१ मजुरांच्‍या संदर्भात हा भाग प्रकर्षाने दिसून येतो.

. . . अशाच भाव-भावना बोगद्यात अडकलेल्‍या ४१ मजुरांच्‍या संदर्भात का दिसत नाहीत ?

यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारधाम यात्रेच्‍या सुलभतेसाठी १२ सहस्र कोटी रुपये खर्च करून ८२५ कि.मी. लांबीचा महामार्ग बनवण्‍याचा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प चालू आहे. गंगोत्रीकडे जाणार्‍या महामार्ग क्र. ९४ वर सिल्‍कायरा आणि दंडनेगाव येथे साडेचार कि.मी.चा बोगदा खोदण्‍यात येत आहे. हे काम चालू असतांनाच १२ नोव्‍हेंबरला बोगद्याचा पुढचा भाग कोसळला आणि बोगद्यात ४१ मजूर अडकले. आजपर्यंत हे मजूर तेथेच अडकलेले आहेत. त्‍यांची दिवाळी या निसर्गाच्‍या अंधारकोठडीतच गेली. फटाक्‍यांच्‍या आतषबाजीत या मजुरांच्‍या किंकाळ्‍या उत्‍सवी वातावरणातील देशवासियांना बहुधा ऐकूही गेल्‍या नसाव्‍यात. त्‍यामुळेच या मजुरांविषयी फारशा भाव-भावना व्‍यक्‍त होत नसल्‍याचे चित्र दिसत आहे. क्रिकेटमध्‍ये आपला संघ जिंकावा, यासाठी व्‍याकुळ होणारी मने, बोगद्यात अडकलेल्‍यांच्‍या सुटकेसाठी व्‍याकुळ होतांना दिसत नाहीत. एवढेच काय; पण एरव्‍ही गरिबांचा कैवार असल्‍याचा आव आणणार्‍या काँग्रेससारख्‍या पक्षांनाही या मजुरांविषयी काहीच देणेघेणे नाही, असेच दिसून येत आहे. एरव्‍ही गरिबांवर अन्‍याय झाला; म्‍हणून गळे काढणार्‍या विरोधी पक्षांना गेल्‍या १० दिवसांपासून मृत्‍यूच्‍या उंबरठ्यावर उभे असलेल्‍या मजुरांविषयी काहीच वाटत नाही का ? एरव्‍ही अन्‍यायग्रस्‍तांच्‍या कुटुंबियांना त्‍यांच्‍या घरी जाऊन भेटणार्‍या लोकप्रतिनिधींना या मजुरांच्‍या कुटुंबियांना भेटून त्‍यांना आधार द्यावासा वाटत नाही का ? यातील काहीही झालेले दिसत नाही. ‘अडकलेल्‍यांच्‍या सुटकेसाठी आपण प्रत्‍यक्ष काय प्रयत्न करणार ?’, असा प्रश्‍न आपल्‍याकडील मोठा वर्ग निश्‍चित विचारू शकतो. त्‍यांना हे सांगितले पाहिजे की, आपण विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धा तरी प्रत्‍यक्ष कुठे खेळू शकतो ? तरीही आपण भारतीय खेळाडूंना ‘आपले’ म्‍हणून प्रोत्‍साहन देतोच ना ! असाच आपलेपणा सर्वांसाठीच असावा, इतकेच सांगायचा हा प्रयत्न आहे. आपण निदान संवेदनशीलता तरी दाखवू शकतो. यापूर्वी ‘बोअरवेल’मध्‍ये पडलेल्‍यांच्‍या संदर्भात वृत्तवाहिन्‍यांनी दिवसरात्र तीचतीच बातमी अनेकदा दाखवलेली आहे, तितकी संवेदनशीलता या घटनेत दिसून येत नाही. अर्थात् या मजुरांच्‍या सुटकेसाठी शासनाने अगदी आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरचे साहाय्‍य घेतले आहे. त्‍यांना बाहेर काढण्‍यात अद्याप जरी यश आले नसले, तरी ते लवकरच सुखरूप बाहेर पडतील, यात शंका नाही.

विविध प्रकारच्‍या आपत्तींच्‍या माध्‍यमांतून निसर्गाला आपल्‍याला काही सांगायचे आहे का ? हे पहायला हवे. उत्तरांचल ही देवभूमी आहे. अलीकडे तेथे महापूर, भूस्‍खलन अशा अनेक आपत्ती येण्‍याचे प्रमाण वाढत आहे. यास मानवी चुका कारणीभूत आहेत का ? हे पहायला हवेच; परंतु यातून निसर्गाला कुठला वेगळा संदेश द्यायचा आहे का ? सातत्‍याने वेगवेगळ्‍या प्रकारच्‍या येणार्‍या अडथळ्‍यांवरून ‘निसर्गाला खरोखरच असा विकास मान्‍य आहे का ?’, याचेही चिंतन करण्‍याची वेळ आली आहे.