महाराष्ट्रातील एक अग्रगण्य साहित्यिक राम गणेश गडकरी ! अल्प आयुष्यात त्यांनी प्रचंड साहित्य निर्माण केले. ‘गोविंदाग्रज’ या नावाने त्यांनी काव्य लेखन केले. ‘चिंतातूर जंतू’ नावाची त्यांची एक कविता आहे, त्या कवितेची मला आठवण झाली. या चिंतातूर जंतूंना देवाविषयी तक्रार आहे. या कवितेत गोविंदाग्रजांनी चिंतातुरांना वाटणारी चिंता व्यक्त केली आहे.
गोविंदाग्रजांनी देवाला केलेली प्रार्थना !‘चिंतातूर जंतू’ या कवितेत शेवटी गोविंदाग्रजांनी देवाला प्रार्थना करतांना लिहिले आहे… देवा विश्वसंचार राहू द्या राहिला तरी । अशी आपणही प्रार्थना करावी, असे जर कुणाला वाटले, तर त्यात कुणाचा दोष आहे ? |
१. चिंतातुरांचा जीव कशाने तळमळतो ?
रात्री सगळे जग झोपलेले असते. अशा वेळी गगनाला असंख्य तारका खिळलेल्या असतात. त्यांचा काहीच उपयोग होत नाही; पण देवाला याविषयी काही वाटत नाही. ‘सूर्याचा प्रकाश उघड्या माळरानावर पडतो आणि सूर्यप्रकाशाची उधळपट्टी होते’, हे या चिंतातूर जंतूंना बघवत नाही. झाडांना हिरवी पाने उगाचच येतात. शेवटी ही पाने मातीत मिसळून जातात, मग त्या पानांचा उपयोग काय ? झाडांना उगाचच हिरवी पाने देवाने दिली आहेत. पुराचे पाणी वाहून जाते. पाण्याचा होणारा हा नाश पाहून या चिंतातूर जंतूंचा जीव तळमळतो.
गोविंदाग्रजांच्या या कवितेची आठवण होण्याचे कारण आपल्या देशातील अनेक चिंतातूर जंतूंना हिंदूंचे सण आले विशेषतः दिवाळी आली की, विविध प्रकारच्या प्रदूषणाने होणारी हानी ध्यानात येते. मग त्यांना कोणत्या गोष्टीचा उमाळा येईल, ते सांगता येत नाही.
२. अयोध्यानगरीत दिवाळीच्या निमित्ताने पणत्या लावल्याने चिंतातुरांचा जळफळाट !
प्रभु श्रीरामांच्या अयोध्यानगरीत दिवाळीच्या निमित्ताने २५ लाख पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. त्यासाठी वापरण्यात आलेले तेल, म्हणजे त्यांना उधळपट्टी वाटते. त्यात एक व्हिडिओ (ध्वनीचित्रफीत) प्रसारित करण्यात आला. या व्हिडिओत त्या पणतीतील तेल काही गरीब माणसे चोरून नेत असल्याचे दाखवण्यात आले. ‘देशात एवढी गरिबी असतांना २५ लाख पणत्या प्रज्वलित करून तुम्ही काय मिळवले ? त्यापेक्षा तेच तेल गरिबांमध्ये वाटले असते, तर काय बिघडले असते ? दिवाळीत अशी उधळपट्टी करणे, म्हणजे आपल्या बुद्धीचे दिवाळे निघाले आहे. हे मानसिक प्रदूषण आहे’, असा सूर या चिंतातूर जंतूंनी लावला.
३. घरातील दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्यास चिंतातूर जंतू शांत बसणार का ?
हिंदूंनी त्यांचे कोणतेही सण साजरे करायचे नाहीत आणि त्यांनी ते साजरे केले की, सर्व गोष्टींची उधळपट्टी होते. पणतीमधील तेल चोरून नेणारे सर्व गरीब आहेत. या चिंतातूर जंतूंना यांचीच काळजी आहे. उद्या ‘एखाद्या चोराने त्यांच्या घरात शिरून घरातील रोख रक्कम, दागदागिने आणि काही मौल्यवान वस्तू चोरून नेल्या, तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याची आवश्यकता नाही. ‘त्यांच्या घरातून पैसा, मौल्यवान वस्तू, दागदागिने चोरून नेणारा माणूस हा अत्यंत गरीब आहे. म्हणून तो त्यांच्या घरात चोरून शिरला आणि त्यांच्या घरातील या वस्तू पळवून नेल्या’, असा विचार करून या चिंतातूर जंतूंनी ‘आपल्या हातून सत्कार्य घडले’, असा विचार करून शांत बसावे.
४. लाच घेणार्यावर कारवाई न करण्याची मागणी केल्यास आश्चर्य ते काय ?
‘एखाद्या व्यक्तीने लाच घेतली, भ्रष्टाचार केला, तर तो गरीब आहे, असे समजावे. त्याला मिळत असलेले वेतन तुटपुंजे असल्याने त्याला असा वाम मार्ग स्वीकारावा लागला’, असा विचार करून ‘लाच घेणारे आणि भ्रष्टाचार करणारे यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये’, अशी मागणी भविष्यात चिंतातूर जंतूंनी केली, तर नवल वाटण्याचे कारण नाही.
५. …अन्य प्रदूषणाविषयी चिंतातूर बोलतील का ?
दिवाळी सण साजरा करतांना हिंदू फटाके फोडतात. त्यामुळे आवाजाचे, तर फटाक्यांच्या धुरामुळे हवेचे प्रदूषण होते. ‘हिंदूंनी दिवाळीचा सण साजरा करतांना पणत्या पेटवू नयेत, फटाके वाजवू नयेत, रोषणाई करू नये; कारण ती उधळपट्टी आहे. विविध प्रकारचे प्रदूषण या दिवाळीत होते, त्यामुळे हिंदूंनी दिवाळी साजरी करू नये’, असे या चिंतातूर जंतूंना वाटते. फटाक्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि धुरामुळे होणारे वायूप्रदूषण हेच या चिंतातूर जंतूंना खुपते आहे. ‘केवळ फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनीप्रदूषण होते का ?’, असा प्रश्न या चिंतातूर जंतूंना कधीही स्वप्नातसुद्धा पडत नाही.
हे चिंतातूर जंतू स्वतःच्या गाड्यांमधून फिरतात. त्या वेळी त्यांच्या गाडीतून बाहेर पडणारा धूर हवेचे प्रदूषण करत नाही का ? विविध कारखान्यांमधून यंत्रांचा होणारा आवाज ध्वनीप्रदूषण करत नाही का ? त्या कारखान्यात काम करणार्या कामगारांच्या कानावर पडणार्या यंत्रांच्या आवाजाने त्यांना बहिरेपणा येईल, याची चिंता चिंतातूर जंतूंना वाटत नाही. रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे रसायनयुक्त पाणी नाल्यांमधून वहात शेवटी समुद्रात जाते. त्यामुळे होणार्या पाण्याच्या प्रदूषणाविषयी त्यांना चिंता वाटत नाही; कारण याचा हिंदु धर्माशी संबंध येत नाही.
६. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणार्या दिवसाविषयी चिंतातूर जंतूंचे खरे दुखणे !
दिवाळीत हिंदु ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस उत्साहाने साजरा करतात. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, त्याचा हा ‘आनंदोत्सव’ आहे. हा आनंदोत्सव या चिंतातूर जंतूंना अस्वस्थ करतो. ‘एकाने दुसर्याची हत्या करून मिळवलेला विजय साजरा करणे, हे मानसिक प्रदूषण आहे. असे उत्सव साजरे करणे, म्हणजे मानवतेची हत्या आहे. म्हणून हिंदूंनी दिवाळी सण साजरा करता कामा नये’, असेही या चिंतातूर जंतूंचे म्हणणे आहे.
दुष्प्रवृत्ती नष्ट करून सुष्ट प्रवृत्तीचे जतन करणे, क्रौर्यावर शौर्याने विजय संपादन करणे, अन्यायाविरुद्ध लढून न्याय प्रस्थापित करणे, अनैतिकतेवर नैतिकतेने विजय संपादन करणे, असत्याला गाडून सत्याचा डंका पिटणे आणि अमानवतेला नष्ट करून मानवतेला जपणे, हे विवेकाचे सद़्भावनेचे अन् निरोगी मानसिकतेचे लक्षण आहे. असे विजय साजरे करणे, म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणे होय. ‘पराभवाची स्मारके जतन करून विजयाची इच्छा नष्ट करणे आणि पराभूत मानसिकताच जतन करणे, हे अमानवीय लक्षण आहे’, हा विचार चिंतातूर जंतूंच्या विद्वत्तेला पचत नाही. हे खरे दुखणे आहे.
७. शौर्य आणि क्रौर्य यांविषयी चिंतातूर लोक पाजळत असलेले घातक तत्त्वज्ञान !
या मंडळींना शौर्य आणि क्रौर्य यांतील भेदच कळत नाही अन् कळत असला, तरीसुद्धा हिंदूंना त्यांचे सण आनंदाने साजरे करू द्यायचे नाहीत. ‘हिंदु सुखात आणि आनंदात उत्सव साजरे करतात’, हीच गोष्ट त्यांना अस्वस्थ करते. मग त्यांना मानवतेची चिंता वाटू लागते. त्यांच्या लेखी ‘सहस्रावधी निरपराध लोकांना गोळ्या घालणार्या आतंकवाद्यांना मारणे’, ही हिंसा आहे. ‘आतंकवाद्यांनी सर्वसामान्य जनांची केलेली हत्या, म्हणजे वाट चुकलेले गरीब बापडे आतंकवादी आहेत. ते बेकार आहेत. त्यांच्या हाताला काम नाही; म्हणून ते अशा प्रकारचे कृत्य करतात, त्याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे’, असे तत्त्वज्ञान या चिंतातूर लोकांनी सांगण्यास आरंभ केला आहे.
वास्तविक विनाकारण कुणाचाही जीव घेणे, कुणालाही छळणे, उपद्रव देणे, हे क्रौर्य आहे. ज्यांच्यामुळे सहस्रावधी लोकांना उपद्रव होतो, जीवित हानी होते, त्यांचा बंदोबस्त करणे, हे सज्जनतेचे आणि मानवतेचे लक्षण आहे.
८. सभ्यता आणि मानवता यांच्या नावाखाली चिंतातूर जंतूंचा हिंदूंविषयी पराकोटीचा द्वेष !
हत्या आणि बलात्कार करणार्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करणे वा त्याला फाशीची शिक्षा देणे, हा मानवतेला कलंक असेल, तर देशातील सर्व न्यायालये बंद करावी लागतील. असे करून चालणार आहे का ? चिंतातूर जंतूंना हा विचार अजिबात सुचत नाही; कारण त्यांच्या मनात हिंदूंविषयी पराकोटीचा द्वेष आहे. ‘हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदु समाज समूळ नष्ट व्हावा’, हेच त्यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठीच त्यांना नको त्या गोष्टीची चिंता लागून रहाते. हे चिंतातूर जंतू सभ्यतेचा आणि मानवतेचा आव आणून मानवता, सभ्यता अन् सुसंस्कृतता विकलांग करण्याचा प्रयत्न करत आहेत. दैवी संपत्ती नष्ट करून आसुरी संपत्तीचे जतन करण्याची दुर्बुद्धीच खरे मानसिक प्रदूषणाचे मूळ आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१८.११.२०२३)