कपटी चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे खोटारडेपणाचे टोक !
सॅन फ्रॅन्सिस्को (अमेरिका) – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी येथे चालू असलेल्या एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात म्हटले की, चीनने त्याच्या स्थापनेपासून एक इंचही विदेशी भूमी नियंत्रणात घेतलेली नाही. आजपर्यंत चीनमुळे युद्ध चालू झालेले नाही. ‘आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन’च्या शिखर परिषदेसाठी जिनपिंग यांनी वरील विधाने केली. (वर्ष १९५० मध्ये तिबेटवर कुणी आक्रमण केले ? वर्ष १९६२ मध्ये भारतावर कुणी आक्रमण केले ? या गोष्टी जगाला ठाऊक नाहीत, अशा आविर्भावात शी जिनपिंग बोलत आहेत आणि अमेरिकी नागरिक मौन बाळगून ऐकत आहेत ! – संपादक)
जिनपिंग पुढे म्हणाले की, चीन विकासाच्या कोणत्याही (कितीही उच्च) स्तरावर पोचला, तरी आम्ही कुठेही नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार नाही. आम्ही आमची इच्छा इतरांवर कधीही लादणार नाही. चीनला स्वत:चा प्रभाव वाढवायचा नाही आणि आम्ही कुणाशीही युद्ध करणार नाही. (‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करणार्या चीनची मानसिकता जगाला ठाऊक असल्याने शी जिनपिंग यांच्या असल्या थापांवर कोण विश्वास ठेवणार ? – संपादक)
|
अमेरिका-चीन संबंधांविषयी बोलतांना जिनपिंग म्हणाले की, जगाला चीन आणि अमेरिका यांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. स्वतःच्या लाभासाठी आणि चीनच्या हानीसाठी काम करणे चुकीचे आहे. जगात कितीही पालट झाले, तरी अमेरिका आणि चीन यांच्यामधील शांततापूर्ण संबंध कधीही पालटणार नाहीत. चीन कधीही अमेरिकेच्या विरोधात काम करत नाही. आत्मविश्वासपूर्ण आणि सतत प्रगती करत असलेली अमेरिका पाहून आम्हाला पुष्कळ आनंद होईल. यासमवेतच अमेरिकेनेही चीनच्या अंतर्गत सूत्रांमध्ये ढवळाढवळ करू नये. आपण सर्वांनी मिळून शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध चीनचे स्वागत केले पाहिजे. (चीन खरेच असे असता, तर जगाने नक्कीच स्वागत केले असते; मात्र चीनचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असल्याने त्याचे स्वागत करणे शक्य नाही ! – संपादक)
हे आहे चिनी ड्रॅगनचे वास्तव !
|
संपादकीय भूमिका
|