पाकमध्ये कारवाया करणार्या आतंकवादी संघटनेवर कारवाई करण्यास तालिबानचा नकार !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेकडून पाकिस्तानमध्ये सातत्याने आतंकवादी आक्रमणे केली जात आहेत. यात पाकची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. पाकने या संघटनेवर कारवाई करण्यासाठी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारकडे मागणीही केली आहे; मात्र तालिबानने ‘ही संघटना आमच्या देशात नाही, तर तुमच्यात देशात कार्यरत आहे’, असे सांगत ‘तुम्हीच तिच्यावर कारवाई करा’, असे उत्तर दिले आहे. यामुळे संतप्त पाकिस्तानने तालिबानला त्याच्यावर आक्रमण करण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. ‘तालिबानला आमची ‘क्षमता’ ठाऊक आहे’, अशा शब्दांत पाकने धमकी दिली आहे.
१. टीटीपीवर कारवाई करण्यासाठी तालिबानवर दबाव निर्माण व्हावा, यासाठी पाकने त्याच्या देशातील १७ लाख अफगाण निर्वासितांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहे. यांतील काही लाख जण अफगाणिस्तानमध्ये परतलेही आहेत. यावरून तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.
२. पाकने तालिबानकडे टीटीपाच्या ठिकाणांची माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले होते. त्यावर तालिबानने सांगितले की, टीटीपी हा पाकचा अंतर्गत प्रश्न असून तो अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार येण्याच्या आधीपासून आहे, असे सांगत कारवाईची मागणी फेटाळली आहे.
३. पाकने गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये घुसून टीटीपीच्या काही ठिकाणांवर आक्रमणे केली होती. त्यास तालिबानने विरोध केला होता.
४. ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर पाकमध्ये आतंकवादी आक्रमणांमध्ये ६० टक्के वाढ झाली आहे. यासह आत्मघाती आक्रमणांमध्ये ५०० टक्के वाढ झाली आहे, असे पाकचे काळजीवाहू पंतप्रधान काकर यांनी सांगितले आहे.