आचारसंहितेत पालट केला असल्यास निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे ! – उद्धव ठाकरे

मुंबई – वर्ष १९८७ मध्ये हिंदुत्वाचा प्रचार केला; म्हणून निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी काढून घेतला. आज मात्र निवडणूक आयोगाने आचारसंहितेत पालट केल्याचे आम्हाला वाटते. तसे असेल, तर निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

कर्नाटक राज्यातील निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करतांना ‘बजरंगबली की जय’ म्हणणयाचे आवाहन केले, तर काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी मध्यप्रदेशात भाजपला निवडून दिल्यास श्री रामललाच्या दर्शनासाठी विनामूल्य नेण्याची घोषणा केली. असे असेल, तर आम्हीही येत्या निवडणुकीत जनतेला आवाहन करतो की, ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’, ‘गणपति बाप्पा मोरया’ असे म्हणूनच मतदान करावे. वर्ष १९८७ मध्ये मुंबईतील पार्ले येथील पोटनिवडणुकीत  आमच्याकडून रमेश प्रभु जिंकले होते. भाजप आमच्या विरोधात होता. ही पहिली निवडणूक आम्ही हिंदुत्वाच्या सूत्रावर जिंकली. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. तो योग्य होता कि आता पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री करत आहेत, ते योग्य आहे ? असा प्रश्‍न या वेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.