१. नामजपादी उपाय केल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण उणावणे
‘मला मधुमेहाचा त्रास आहे. गेल्या ३ – ४ वर्षांपासून माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण ४५० ते ५०० एवढे होते. त्यावर औषधांचा परिणाम होत नव्हता. त्यासाठी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी मला ६ घंटे नामजपादी उपाय करायला सांगितले होते. त्याप्रमाणे मी नामजपादी उपाय करू लागल्यानंतर एक वर्षाने औषधांचा परिणाम होऊ लागल्याचे लक्षात आले आणि माझ्या रक्तातील साखर कमी होऊन ती ३०० ते ३५० पर्यंत उतरली.
२. अचानक उद्भवलेल्या आजारपणात सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपामुळे लाभ होणे
२ अ. जेवणाचे प्रमाण अचानक उणावणे आणि चक्कर येणे, तोल जाणे इत्यादी त्रास होऊ लागणे : गेल्या मासात साधारण १५-२० दिवसांपासून अचानक माझे जेवण न्यून होत गेले. खाल्लेले पदार्थ मला पचेनासे झाले. माझा थकवा वाढत गेला. नंतर मला चालतांना चक्कर येणे, तोल जाणे इत्यादी त्रासही होऊ लागले. तशाच स्थितीत मी सेवाही करत होते. मला वाटले, ‘माझ्या रक्तातील साखर वाढली असावी’; म्हणून मी उपचार घेत असलेल्या होमिओपॅथी वैद्यांना सांगितले. त्यांनी साखर पडताळली असता, ती कमी होऊन २०० वर आल्याचे सांगितले; मात्र ‘मला होत असलेला त्रास त्यामुळे नाही’, असेही त्यांनी सांगितले.
२ आ. विविध शारीरिक त्रास आधुनिक वैद्यांना सांगितल्यावर त्यांनी ‘हृदयस्पंदालेख’ (ई.सी.जी.) काढून रुग्णालयात भरती होण्याचा समादेश देणे : याच कालावधीत पायासाठी ‘भौतिकोपचार’ (फिजिओथेरपी) चालू होते. ते उपचार करणार्या आधुनिक वैद्यांना मी त्यांनी सांगितलेले काही नवीन व्यायाम प्रकार करतांना माझा डावा पाय आणि कटी यांत वेदना वाढल्याचे सांगितले. त्यांनी पाय आणि कटी यांचे दुखणे आधुनिक वैद्यांना दाखवण्यास सांगितले. आश्रमातील आधुनिक वैद्यांना मला होत असलेले सगळे त्रास सांगितल्यावर त्यांनी माझा ‘हृदयस्पंदालेख’ (ई.सी.जी.) काढून त्याचा अहवाल समवेतच्या आधुनिक वैद्यांना दाखवला. तेव्हा त्यांनी मला लगेच रुग्णालयात भरती होण्याच्या तयारीनेच ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालया’च्या रुग्णालयात जाण्याचा निरोप दिला.
२ इ. रुग्णालयात भरती होण्यापूर्वी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ काका यांना नामजपादी उपाय विचारल्यावर त्यांनी ४ घंटे जप करून नंतर चाचणी करण्यास सांगणे : रुग्णालयात भरती होण्यासंदर्भात समजून घेण्यासाठी माझ्या मुलाचे (डॉ. अंजेश याचे) डॉ. पांडुरंग मराठे यांच्याशी बोलणे झाले असता, त्यांनी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना नामजपादी उपाय विचारून घेण्यास सांगितले. सद़्गुरु डॉ. गाडगीळकाका यांनी मला एक नामजप ४ घंटे करण्यास सांगितला. तो नामजप मी करू लागले. तेवढ्यात तो जप थांबवून दुसरा करण्याचा निरोप मिळाला. दुसर्या जपास आरंभ केल्यावर काही वेळातच आणखीन एक जप करण्याचाही निरोप मिळाला. हे दोन्ही जप एक-एक घंटा आलटून पालटून असे एकूण ४ घंटे करण्यास सांगितले आणि त्यानंतर पुन्हा ‘हृदयस्पंदालेख’ (ई.सी.जी.) काढून पहाण्यास सांगितले. त्यानुसार ४ घंटे माझ्याकडून चांगला जप झाला.
२ ई. आधुनिक वैद्यांनी रुग्णालयात भरती होण्यास सांगणे आणि रुग्णालयात सद़्गुरु गाडगीळकाका यांनी दिलेला नामजप करत रहाणे : सद़्गुरु डॉ. गाडगीळकाका यांनी ‘‘रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही, तरी वैद्यांचे मत घ्यावे’’, असे सांगितले. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी माझा ‘हृदयस्पंदालेख’ (ई.सी.जी.) काढून त्यानुसार रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे सगळी तयारी करून आम्ही रुग्णालयात जाण्यासाठी निघालो. त्या वेळीही सद़्गुरु गाडगीळकाका यांनी आधीच्या जपांपैकी पहिला जप करत रहाण्यास सांगितले. रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्यापासून तो नामजप होत होता.
२ उ. रुग्णालयात प्राथमिक तपासण्या करून उपचार केल्यावर रक्तदाब सामान्य झाल्याचे आढळणे : रुग्णालयात गेल्यावर तेथे आधुनिक वैद्यांनी काही प्राथमिक तपासण्या केल्या. माझा रक्तदाब तपासला. तो थोडा वाढलेला होता. पुन्हा एकदा माझा ‘हृदयस्पंदालेख’ (ई.सी.जी.) काढला. रक्तदाब कमी होण्यासाठी डॉक्टरांनी मला एक ‘इंजेक्शन’ दिले आणि २ घंट्यांनी पुन्हा रक्तदाब पाहिला. तो न्यून होऊन सामान्य झाला होता.
२ ऊ. रात्री सद़्गुरु गाडगीळकाका यांनी दिलेला नामजप पालटून श्रीकृष्णाचा जप होऊ लागल्यावर ‘नामजपाचे कार्य संपल्याने नामजप पालटला आहे’, असे जाणवणे आणि त्यानंतर सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य येणे : साधारण रात्री १२ वाजता ‘अजून एक चाचणी करावी लागेल’, असा निरोप आम्हाला मिळाला. त्यासाठी माझे रक्त घेतले. त्यानंतर साधारण पाऊण तासाने माझा होत असलेला नामजप आपोआप पालटला आणि नेहमीच्या श्रीकृष्णाच्या जपाचा आरंभ झाला. हे माझ्या लक्षात येताच मी लगेच प्रार्थना करून सद़्गुरु गाडगीळकाका यांनी सांगितलेला नामजप पुन्हा करू लागले; पण तरीही पुन्हा माझा नामजप पालटून नेहमीचा नामजप होऊ लागला. त्या वेळी ‘या जपाचे कार्य झाले वाटते’, असा माझ्या मनात विचार आला, तरीही मी माझ्या समवेत असलेल्या साधिकेला माझा जप पालटल्याचे सांगितले. तेव्हा तिने ‘प्रयत्न करून पुन्हा सांगितलेला जप करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर जो होईल तो करा’, असे सांगितले. त्यानंतर काही वेळ सद़्गुरु काकांनी सांगितलेला नामजप झाला आणि पुन्हा पालटून नेहमीचा जप होऊ लागला. (यासंदर्भात नंतर मी सद़्गुरु काकांना विचारले असता, त्यांनीही त्या जपाचे कार्य झाल्याने तो पालटल्याचे सांगितले.) त्यानंतर सगळ्या चाचण्यांचे अहवाल सामान्य (नॉर्मल) आल्याने डॉक्टरांनी ‘रुग्णालयात भरती करण्याची गरज नाही, तुम्ही जाऊ शकता’, असे सांगितले आणि काही अन्य चाचण्या करून घेण्यास सांगितले.
३. आधुनिक वैद्यांनी रुग्णालयात जाण्यास सांगितल्यापासून सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य येईपर्यंतच्या काळात असलेली मनाची स्थिती
या संपूर्ण कालावधीत माझी आंतरिक स्थिती पुष्कळ शांत होती. संथ लयीत माझा नामजप होत होता. जपाचे अनुसंधान टिकून होते आणि भावजागृतीही होत होती. शेवटच्या २ घंट्यांमध्ये माझ्या समवेत रुग्णालयात आलेल्या साधिकेशी जे बोलणे झाले, त्यामुळे ‘भावसत्संगच झाला’, असे आम्हाला वाटले. साधिकेने तसे बोलूनही दाखवले. ‘ही स्थिती सतत टिकून रहायला हवी’, या विचाराने प्रार्थनाही झाली.
४. उपायांसाठी सांगितलेले नामजप आणि त्यांचे जाणवलेले परिणाम
४ अ. पहिला ‘हृदयस्पंदालेख’ (ई.सी.जी.) काढल्यानंतर रुग्णालयात जाण्यापूर्वी करण्यास सांगितलेले जप
४ अ १. एक-एक घंटा आलटून पालटून करण्यास सांगितलेला पहिला जप : शून्य
अ. न्यास : एका हाताचा तळवा अनाहतचक्रासमोर आणि दुसर्या हाताचा तळवा सहस्रारचक्राच्या वर धरणे
आ. नामजप करतांना जाणवलेली सूत्रे
१. जप आरंभापासून पुष्कळ शांतपणे झाला.
२. जप अगदी संथ लयीत होत होता.
३. जप करतांना माझा श्वासोच्छ्वासही आतून पुष्कळ संथ लयीत होत होता.
४. या जपाने माझी एकाग्रता आणि अनुसंधान वाढले.
५. मला आतून पुष्कळ आनंद जाणवत होता.
४ अ २. एक-एक घंटा आलटून पालटून करण्यास सांगितलेला दुसरा जप : ‘श्रीराम जय राम जय जय राम । श्रीराम जय राम जय जय राम । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’
अ. न्यास : देवतांचा जप असल्याने न्यास नाही.
आ. नामजप करतांना जाणवलेली सूत्रे
१. मोठे आणि तीन वेगवेगळे जप असूनही ते आतून आणि पुष्कळ संथ लयीत होत होते.
२. माझी भावजागृती होत होती.
३. जपाला आरंभ केल्यावर काही क्षणांतच माझ्या मस्तकाच्या वरच्या भागात (सहस्रारचक्राच्या ठिकाणी) काही तरी हालचाल जाणवली आणि केसांपेक्षाही बारीक अशा नसांचे जाळे जाणवले. त्यांतून प्रवाह वहात असल्याचे मला जाणवले. ‘हा कसला प्रवाह होता ?’, ते लक्षात आले नाही; मात्र प्रकाशमय तंतूंचे जाळे सूक्ष्मातून जाणीवेच्या स्तरावर दृश्यमान झाले. त्यानंतर क्षणार्धात माझ्या मानेच्या उजवीकडच्या भागातून साधारण १ सें.मी. जाडीच्या एका नसेतून एक प्रवाह कानामागून वरच्या दिशेने वहातांना जाणवला. त्यानंतर माझे जड झालेले डोके हलके झाले.
४. हळूहळू माझ्या संपूर्ण शरिरातून कसलातरी प्रवाह एका लयीत वहात असल्याचे जाणवले.
५. माझा संपूर्ण देह प्रकाशमान झाल्याचे जाणवले.
४ आ. रुग्णालयात जातांना करण्यास सांगितलेला जप : शून्य
अ. न्यास : एका हाताचा तळवा अनाहतचक्रासमोर आणि दुसर्या हाताचा तळवा सहस्रारचक्राच्या वर धरणे
आ. नामजप करतांना जाणवलेली सूत्रे
१. रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्यापासून परत येईपर्यंत मी शांत आणि स्थिर होते.
२. मला आतून पुष्कळ आनंद जाणवत होता.
३. ‘मी खोल शांतीच्या डोहात आत-आत जात आहे’, असे जाणवले.
४. मला निःस्पंदन शांती जाणवली.
४ इ. रुग्णालयातून परत आल्यावर पुढील वैद्यकीय चाचण्या पूर्ण होईपर्यंत करण्यास सांगितलेला जप : निर्गुण
अ. न्यास : एका हाताचा तळवा अनाहतचक्रासमोर आणि दुसर्या हाताचा तळवा सहस्रारचक्राच्या वर धरणे
आ. अवधी : प्रतिदिन ३ घंटे
इ. नामजप करतांना जाणवलेली सूत्रे
१. जप संथ लयीत होतो.
२. जप करतांना श्वासाची गती पुष्कळ संथ होते.
३. जप झाल्यावर पुष्कळ हलके वाटते.
४. काही वेळा गाढ ध्यान लागते.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
भगवंताने आजारपणाच्या माध्यमातून माझे किती जन्मांचे प्रारब्ध दूर केले असेल, याचे अनुमान लावणे माझ्यासारख्या पामराला कठीण आहे; मात्र या निमित्ताने त्यानेच सांगून करून घेतलेल्या उपायांमधून नामजपादी उपाय, देवतांच्या नावांचा जप आणि साधना यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखीत झाले. यासाठी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘हे गोविंदा, हे गुरुदेवा, या जिवाला तुझ्या चरणी घे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझी सेवा करता येऊ दे’, हीच प्रार्थना !’
– सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१०.२०२३)
|