उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. शिवम् महेश साळुंखे हा या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
आश्विन कृष्ण अष्टमी (५.११.२०२३) या दिवशी चि. शिवम् महेश साळुंखे याचा पहिला वाढदिवस झाला. त्या निमित्त त्याच्या आई-वडिलांना त्याच्या जन्मापूर्वी आलेल्या अनुभूती आणि जन्मानंतर त्यांना अन् त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची सूत्रे, गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. जन्मापूर्वी
१ अ. पत्नीच्या पोटावर हात ठेवून गर्भाशी बोलतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप आपोआप चालू होणे : ‘माझ्या आस्थापनातील माझ्या मित्राने मला ‘मनःशक्ती’ संप्रदायाची गर्भसंस्काराची काही पुस्तके भेट दिली होती. त्यात ‘गर्भवतीच्या पोटावर हात ठेवून गर्भाशी बोलावे’, याविषयी माहिती दिली आहे. त्याप्रमाणे पत्नी ५ मासांची गर्भवती असतांना मी तिच्या पोटावर हात ठेवून गर्भाशी बोलतांना माझा आपोआप ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू होत असे. एकदा रात्री झोपेत चुकून माझा हात पत्नीच्या पोटाला लागल्यावर मी झोपेत मोठ्याने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करू लागलो. हा प्रसंग सकाळी उठल्यावर माझी पत्नी सौ. प्रणाली हिने मला सांगितला.’
– श्री. महेश सदाशिव साळुंखे (शिवम्चे वडील), खांदा कॉलनी, पनवेल.
१ आ. गर्भारपणात प्रतिदिन नामजप करून स्तोत्रे म्हणणे : ‘गर्भारपणात मी न चुकता प्रतिदिन नामजप करत असे. मी दत्तमाला, हनुमानचालिसा, कालभैरवाष्टक आणि श्री गणपति स्तोत्र म्हणत असे. ‘जसजशी गर्भाची वाढ होत होती, तसतसे माझ्या चेहर्यावरील तेजही वाढत होते’, असे मला जाणवले.
२. प्रसुती : बाळाचा जन्म शस्त्रकर्म करून झाला; पण मला काहीच त्रास झाला नाही. बाळही शांत होते. तो अजिबात रडत नसे. रुग्णालयात असतांना तो रात्री झोपेतून उठलेला आम्हाला कळतही नसे.’
– सौ. प्रणाली महेश साळुंखे (शिवम्ची आई), खांदा कॉलनी, पनवेल.
३. वय १ ते ३ मास
३ अ. सहनशील : ‘बाळ २ मासांचा असतांना त्याच्या उजव्या पायाला लस टोचली होती. लस टोचून आणल्यानंतर तो रडत किंवा किरकिर करत नव्हता.
३ आ. शांत : बाळ २ मासांचा असतांना त्याची आई परीक्षेसाठी जात असे. ती सकाळी जाऊन एकदम सायंकाळी येत असे. या ४ – ५ घंट्यात तो माझ्याकडे किंवा सूनेच्या आईकडे शांत रहात असे.
३ इ. हातांच्या मुद्रा करणे
१. तो २ मासांचा असल्यापासून झोपेत त्याच्या हातांच्या मुद्रा केलेल्या असतात. तेव्हा तो ‘देवाशी बोलत असून त्याच्या अनुसंधानात आहे’, असे बर्याचदा मला जाणवत असे.
२. तो अडीच मासांचा असतांना खेळतांना हातात धनुष्यबाण धरून श्रीराम युद्धाच्या सिद्धतेत असल्यासारखी मुद्रा करायचा.’
– श्रीमती पुष्पा सदाशिव साळुंखे (शिवम्ची आजी, वडिलांची आई), खांदा कॉलनी, पनवेल. (१८.१०.२०२३)
३ ई. बाळाचे नाव ठेवण्याविषयी आलेल्या अनुभूती
३ ई १. बाळाचे नाव ‘शिवम्’ ठेवायचे ठरवणे आणि ३ पिढ्यांतील मुलांची नावे शिवाचीच असणे : ‘बाळ ३ मासांचा असतांना मी, माझी ताई पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार (सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत, वय ३४ वर्षे) आणि माझी आई श्रीमती पुष्पा सदाशिव साळुंखे आम्ही तिघे जण ‘बाळाचे नाव काय ठेवावे ?’, याविषयी बोलत होतो. तेव्हा ताई आम्हाला म्हणाली, ‘‘शिवम्’ नाव ठेवूया.’’ आम्हालाही ते नाव आवडले. माझ्या वडिलांचे नाव ‘सदाशिव’, माझे नाव ‘महेश’ आहे आणि आता बाळाचे नाव ‘शिवम्’ ठेवल्यावर आमच्या तीनही पिढ्यांमध्ये मुलांची नावे ‘शिवा’चीच होतील.
३ ई २. आमचे कुलदैवत ‘खंडोबा’ आहे आणि खंडोबा हा ‘शिवाचा’ अवतार आहे.
३ ई ३. पूर्वज शिवभक्त असणे : काही वर्षांपूर्वी मी माझ्या वडिलांच्या समवेत कोल्हापूरच्या प.पू. तोडकर महाराजांकडे गेलो होतो. तेव्हा महाराजांनी वडिलांना सांगितले होते, ‘‘तुमच्या पूर्वजांनी शिवाची पुष्कळ भक्ती केली आहे.’’
३ ई ४. बाळाचे नाव ‘शिवम्’ ठेवायचे ठरवणे आणि नामकरण विधीसाठी पाटी बनवून आणायला गेल्यावर एका पाटीवर शिवाशी संबंधित शुभचिन्हे असणे : आम्ही बाळाचे नाव ‘शिवम्’ ठेवायचे ठरवले आणि बाळाच्या नामकरण विधीची पाटी बनवण्यासाठी मी दुकानात गेलो. तिथे नावाची एक पाटी रिकामी होती आणि त्या पाटीच्या उजव्या बाजूला आधीपासूनच शिवाशी संबंधित शुभचिन्हे होती. त्या पाटीवर शिवाचा डमरू, त्रिशूळ आणि चंद्र ही चित्रे आधीपासूनच रेखाटलेली होती. त्या पाटीवर मी ‘शिवम्’, असे नाव लिहून घेतले. जणू देवाने बाळाच्या नामकरण विधीची सिद्धता आधीच करून ठेवली होती.
३ ई ५. ‘यू ट्यूब’वर शिवाची भक्तीगीते शोधली नसतांना गाडीत एका पाठोपाठ शिवाची भजने लागणे : नामकरण विधीच्या दिवशी मी चारचाकी गाडीने पत्नीच्या गावी कासेगाव, पंढरपूर येथे निघालो होतो. एरवी प्रवासात मी मारुती आणि विठ्ठल या देवतांची भजने ऐकतो. यापूर्वी मी कधीच ‘यू ट्यूब’वर शिवाची भक्तीगीते शोधली नसतांना त्या दिवशी गाडीमध्ये आपोआपच एका पाठोपाठ शिवाची भजने लागली.’
– श्री. महेश सदाशिव साळुंखे
४. वय ४ ते ६ मास
४ अ. सात्त्विकतेची ओढ
१. शिवम्ला घराशेजारील बागेमध्ये घेऊन गेल्यावर तो रडतो. त्याला तिथे आवडत नाही; पण संकुलातील (देवद येथील) देवळात नेल्यावर तो आनंदी होतो.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पू. वामन यांची ध्यानमुद्रा असलेले छायाचित्र पाहून शिवम्ने आनंदाने आणि मोठ्याने हसून प्रतिसाद दिला.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद आश्रमात आल्या होत्या. ‘त्यांची भेट झाल्यापासून तो पुष्कळ उत्साही झाला आहे’, असे मला जाणवते.
४. शिवम् स्तोत्रे किंवा भजने लावल्यावर आनंदाने आणि उत्साहाने ऐकतो.
४ आ. देवाची ओढ
१. आमच्या घरात बैठककक्षामध्ये श्रीकृष्णाचे मोठे चित्र लावले आहे. शिवम्ला बैठककक्षात आणल्यावर तो श्रीकृष्णाच्या चित्राच्या दिशेने मान वळवून पहात असे.
२. त्याला ‘कृष्णबाप्पा कुठे आहे ?’, असे विचारल्यावर तो मान वळवून कृष्णाच्या चित्राकडे पाहून मोठ्याने हुंकार देत असे.
३. तो कृष्णाच्या चित्राकडे पाहून गतीने शरिराच्या हालचाली करत असेे. तेव्हा ‘तो श्रीकृष्णाशी बोलतो’, असे मला जाणवायचे.
४. माझा मुलगा महेश शिवम्ला खेळवतांना ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, असा लयबद्ध नामजप करायचा. ते ऐकून त्याला पुष्कळ आनंद व्हायचा.
५. शिवम्ला खेळवतांना ‘बजरंग बली की जय’, असे म्हटल्यावर तो आनंदी होऊन जलद गतीने हातपाय हलवायचा आणि हात जयजयकाराच्या मुद्रेत वर करायचा, तसेच डोळे अन् तोंड मोठे करून हनुमानासारखी मुद्रा करायचा.
४ इ. परिस्थिती स्वीकरून शांत रहाणे : शिवम् ६ मासांचा असतांना त्याच्या आईला कांजिण्या झाल्या होत्या. आधुनिक वैद्यांनी ‘बाळाला ६ – ७ दिवस आईच्या संपर्कात ठेवू नका आणि आईचे दूधही देऊ नका’, असे सांगितले होते. तेव्हा तो गायीचे दूध पिऊन शांत रहायचा. त्याने कधीही आईकडे जाण्यासाठी हट्ट केला नाही. तो माझ्याकडे आणि त्याच्या आईच्या आईकडे शांत रहायचा.
५. वय ७ ते ९ मास
५ अ. अनुभूती – प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र दाखवून ‘हे प.पू. बाबा’, असे सांगितल्यानंतर शिवम् ‘बाबा’ शब्द म्हणू लागणे : आम्ही मिरज येथील सनातनच्या आश्रमात गेलो असतांना तो हसून सर्व साधकांकडे जायचा. मिरज आश्रमातील प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र दाखवून मी त्याला म्हणाले, ‘‘हे प.पू. बाबा आहेत.’’ दुसर्या दिवसापासून तो ‘बाऽबा, बाऽबा’, असे बोबडे शब्द बोलू लागला.
५ आ. लहान मुलांची गाणी न ऐकणे, पोवाडा लावल्यावर हुंकार देणे : आमच्या इमारतीत रहाणारी साधिका सौ. प्रियांका सावंत हिने शिवम्ला लहान मुलांची गाणी ऐकवली. शिवम्ने तिकडे लक्षच दिले नाही. त्यानंतर पोवाडा लावल्यावर तो लगेचच हसून हुंकार देऊ लागला.
६. वय ९ मास ते १ वर्ष
६ अ. स्तोत्र लागल्यावर शेजारच्या मुलाला होत जोडायला सांगणारा शिवम् ! : शिवम् स्तोत्र लागल्यावर आनंदाने टाळ्या वाजवतो आणि हात जोडतो. आमच्या शेजारी कु. केतन पवार नावाचा ४ थी च्या वर्गातील मुलगा आहे. त्यालाही शिवम् त्याच्या बोबड्या भाषेत हात जोडायला सांगतो.
७. शिवम्ची जाणवलेली अन्य वैशिष्ट्ये
अ. शिवम् जन्मापासून झोपेतून उठल्यावर कधीही रडला नाही. तो झोपेतून जागा झाल्यावर त्याच्या जवळ कुणीही नसले, तरी तो खेळत रहातो. त्यामुळे बर्याचदा ‘तो कधी उठला ?’, ते आम्हाला कळत नाही.
आ. शिवम्चा चेहरा सात्त्विक असून त्याची कांती प्रकाशमान आहे.
इ. त्याचे हास्य मोहक आहे. त्याच्या हास्याने तो इतरांना आकर्षित करून घेतो. त्याचे हास्य दैवी वाटते.
ई. शिवम् अनोळखी व्यक्तींकडेही जातो. त्याने ज्यांना प्रथमच पाहिलेे आहे, त्यांच्याकडेही तो जातो.
उ. शिवम्ला खेळवतांना छातीशी धरल्यावर माझ्या अनाहतचक्रात भावाची स्पंदने जाणवून भावजागृती होते.’
– श्रीमती पुष्पा सदाशिव साळुंखे
८. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला भाव :
‘शिवम् ६ मासांचा असतांना देवद आश्रमात आला होता. तो माझ्या खोलीत आला, तेव्हा अन्य बालसाधकही त्याच्या समवेत खोलीत आले होते. बालसाधकांच्या समवेत खेळतांना तो शांत होता. थोड्या वेळाने मी कपाटातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे छायाचित्र बाहेर काढले. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर तो हुंकार देऊ लागला. ते पाहून ‘जणूकाही तो गुरुदेवांच्या छायाचित्राशी बोलत आहे’, असे मला जाणवले. नंतर तो छायाचित्राच्या दिशेने पुढे सरकत होता. ‘सहा मासांच्या चिमुकल्या जिवालाही गुरुदेवांची महती कळत आहे’, हे पाहून माझी भावजागृती होत होती.’
– (पू.) सौ. अश्विनी अतुल पवार (शिवम्ची आत्या, सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत, वय ३४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
९. शिवम्च्या पत्रिकेविषयी जाणवलेली सूत्रे
९ अ. बाळाच्या पत्रिकेविषयी आलेली अनुभूती : ‘माझ्या मुलाच्या, म्हणजे महेशच्या पत्रिकेमध्ये ‘त्याची संतती ही अनन्यसाधारण गुणांनी युक्त असेल’, असा उल्लेख आहे. त्याप्रमाणे ‘त्याच्या मुलामध्ये, म्हणजे शिवम्मध्ये अनन्यसाधारण गुण आहेत’, याचा आम्ही अनुभव घेत आहोत.’ – श्रीमती पुष्पा सदाशिव साळुंखे
९ आ. सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील पू. बसवेश्वर ढोले महाराज यांनी शिवम्ची पत्रिका पाहून सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे : ‘आम्ही शिवम्ला माझ्या आजीच्या (माझ्या आईच्या आईच्या) ओळखीचे सांगोला येथील पू. बसवेश्वर वैजिनाथ ढोले महाराज यांच्याकडे घेऊन गेलो होते. त्यांनी शिवम्ची पत्रिका पाहून सांगितलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
१. बाळाच्या जन्माच्या वेळची ग्रहदशा चांगली आहे. बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची शांती किंवा विधी करण्याची आवश्यकता नाही.
२. एखाद्या जिवाच्या पत्रिकेत एखादाच ग्रह प्रबळ असतो; परंतु बाळाचे ३ ग्रह प्रबळ आहेत.
३. या बालकामध्ये केवळ दृष्टीने समोरच्याला बरे करण्याची क्षमता आहे.
४. अशी बालके कुठेही जन्माला येत नाहीत. बालकाचा परिवार सात्त्विक आणि साधना करणारा असल्यामुळे त्या ठिकाणी असे जीव जन्म घेतात.
५. अशी पत्रिका राजे-महाराजे यांची असते.’
– श्री. महेश सदाशिव साळुंखेे, पनवेल
(वरील सर्व सूत्रांचा दिनांक १८.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |