छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानराधा मल्‍टिस्‍टेट सोसायटीचे कार्यालय बंद !

३०० कोटी रुपयांच्‍या ठेवी अडकल्‍या !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – तिरुमला उद्योग समुहाचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांनी सहकुटुंब भाजपमध्‍ये प्रवेश केला. त्‍याच वेळी ते अध्‍यक्ष असलेल्‍या ‘ज्ञानराधा मल्‍टिस्‍टेट सहकारी सोसायटी’च्‍या छत्रपती संभाजीनगर येथील सूतगिरणी चौक येथील कार्यालयाला कुलूप लागले. येथे सहस्रों ग्राहकांच्‍या अनुमाने ३०० कोटी रुपयांच्‍या ठेवी आहेत, असे सांगण्‍यात येत आहे. कुटे, तसेच सोसायटीचे अध्‍यक्ष आणि कर्मचारी यांना दूरभाष केला असता त्‍यांचा भ्रमणभाष बंद होता. सोसायटीच्‍या राज्‍यभरात ५० शाखा असून १ सहस्र ६०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे.

गेल्‍या मासात तिरुमला समुहावर आयकर खात्‍याची धाड पडल्‍यावर अनेकांनी ठेवी काढून घेण्‍यासाठी पाठपुरावा केला. तेव्‍हा शाखा व्‍यवस्‍थापकांनी दिवाळीला ठेवी परत करण्‍याचे आश्‍वासन दिले होते. सकाळी ११ वाजता लोक पोचले, तेव्‍हा कार्यालय बंद होते. लोकांनी आरडाओरड चालू केली, तेव्‍हा एका कर्मचार्‍याने दूरभाष करून पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्‍थळी पोचलेले साहाय्‍यक पोलीस निरीक्षक राठोड म्‍हणाले की, तुमच्‍या ठेवी कुठे जात नाहीत. घाबरू नका. संयम ठेवा. त्‍यावर ‘पैशाविना आम्‍ही दिवाळी कशी साजरी करणार ?’, असा प्रश्‍न लोकांनी केला. त्‍यावर उत्तर मिळाले नाही.

ठेवी बुडवणारी सातवी संस्‍था !

मलकापूर अर्बन, आदर्श, अजिंठा, ज्ञानोबा, यशस्‍विनी, देवाई अशा एकूण ६ बँकांत ७६ सहस्र ६०० ठेवीदार आणि १ सहस्र ९६ कोटी रुपयांच्‍या ठेवी अडकलेल्‍या आहेत, तर यात आता पहिल्‍या ज्ञानराधा सोसायटीची भर पडली आहे.

संपादकीय भूमिका :

ठेवीदारांच्‍या मोठ्या प्रमाणात असलेल्‍या ठेवी परत कधी मिळणार, याविषयी सांगून उद्योग समूहाने आश्‍वस्‍त करायला हवे !