रत्नागिरी येथील कीर्तनसंध्या महोत्सवात ‘आले रामराज्य…’
रत्नागिरी – संपूर्ण भारतदेशालाच नाही, तर जगाला अभिमान वाटेल असे भव्यदिव्य राममंदिर अयोध्येत उभे रहात आहे. याच मंगल घटनेचे औचित्य साधून येथील कीर्तनसंध्या परिवाराच्या वतीने १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणार्या कीर्तनसंध्या महोत्सवात श्रोत्यांना अयोध्याधीश प्रभु श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र अनुभवायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्यावाचस्पती राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांच्या ओघवत्या दिव्य वाणीतून जणू प्रभु श्रीराम रत्नागिरीत अवतरणार आहेत. शहरातील आठवडाबाजार येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या भव्य जागेत ‘आले रामराज्य अर्थात् राममंदिर ते राष्ट्रमंदिर’ (अपरिचित रामायण, राममंदिर संक्षिप्त इतिहास) या विषयावरील कीर्तनसंध्या होणार आहे. ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवांच्या सुमधुर आवाजातील कीर्तनातील रामकथा, बरोबरीने पुण्यातील मंचाच्या वतीने गीतरामायणातील निवडक गाणी ऐकण्याचा सुवर्णयोगही रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळणार आहे.
रत्नागिरीत वर्ष २०१२ पासून चालू असलेल्या कीर्तनसंध्येत छत्रपती शिवाजी महाराजांपासून ‘सर्जिकल स्ट्राइक’पर्यंतचा भारतीय इतिहास लोकांपर्यंत पोचवण्याचे काम केले आहे. यावर्षी मोगल साम्राज्याने भारतियांचे श्रद्धास्थान असलेली अयोध्येची रामजन्मभूमी भारतियांपासून जणू हिरावून घेतली होती. त्यामुळे ५०० वर्षांहून अधिक काळ भारतात नकारात्मक शक्तीची भावना खोलवर रुजली होती. ती नष्ट करण्यासाठी अथक प्रयत्न चालू होते. आता त्याला यश आले आहे.
कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असतांना समाजात विविध क्षेत्रांत काम करत असलेल्या मान्यवरांचा सत्कारही कीर्तनसंध्याच्या व्यासपिठावरून केला आहे. नगर परिषदेतील स्वच्छता कामगार, गणपतीपुळे येथील जीवरक्षक, मतिमंदांची आशादीप संस्था नेटाने चालवणारे दिलीप रेडकर, झाशीच्या राणीचे वंशज नेवाळकर, कीर्तन परंपरेतील सर्वोच्च व्यक्तीमत्त्व ह.भ.प. दत्तदासबुवा घाग, ह.भ.प. ढोल्ये बुवा, गोरक्षक मुकेश गुंदेचा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर, निवृत्त सेनाधिकारी राजेंद्र निंभोरकर, निवृत्त पोलीस राजेंद्र भोसले, महिला वृद्धाश्रम चालवणार्या गायत्री फडके, सामाजिक कार्य करणार्या आफळेबुवांच्या पत्नी सौ. शुभांगी आफळे, रत्नागिरीतील माजी सैनिक समूह अशा अनेकांचा सन्मान कीर्तनसंध्या परिवाराकडून करण्यात आला.
प्रतिवर्षीप्रमाणेच यावर्षी कीर्तनसंध्या होत आहे. भारतीय बैठक विनामूल्य असेल, तर खुर्चीसाठी देणगी सन्मानिका उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी (९०११६ ६२२२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराकडून करण्यात आले आहे.