लांजा येथे गोवंश हत्येसाठी प्रयत्न करणार्‍या तरबेज ठाकूरवर गुन्हा नोंद

बजरंगी आणि पोलीस यांनी केलेल्या कारवाईत १३ गोवंशियांचे प्राण वाचवण्यात यश !

१३ गोवंशियांचे प्राण वाचवण्यात यश !

लांजा – ११ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजता परटवली, सौंदळ तेथील बगवेवाडी येथे तरबेज ठाकूर याने गोवंश कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचा संशय आल्यानंतर येथील बजरंग दलाकडून पोलिसांना तरबेजवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली.

त्यानंतर पोलीस पथकाने माहिती मिळाल्यानुसार सांगितलेल्या ठिकाणी धाड टाकली असता संबंधित जागेवर १० बैल, १ गाय, १ गीर (पाडा) वासरू, १ गाय (पाडी छोटे) अशी एकूण १३ गोवंशियांना चारा-पाण्याची व्यवस्था न करताच त्यांच्या हत्येच्या हेतूने बांधून ठेवलेले आढळले. त्याचप्रमाणे याच ठिकाणाहून पूर्वीही असेच गोवंश बांधून त्यांना हत्येसाठी पाठवली जात असल्याचे लक्षात आले.
पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे तरबेज ठाकूर आरोपीवर गुन्हा नोंद केला आणि  सर्व गोवंश कह्यात घेऊन गोवंशियांना गोशाळेत सुखरूप सोडले.


वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तत्परतेने हालचाली करून गो-तस्करी करणार्‍यावर कारवाई केली. यासाठी लांजा आणि राजापूर येथील बजरंगींनी अथक परिश्रम घेतले. गोवंश हत्या रोखण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या सर्व बजरंगी आणि त्यांना वेळोवेळी सहकार्य करणारे यांचे सर्व स्तरांतून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

संपादकीय भूमिका

असे बजरंगी आता जागोजागी हवेत, तरच गोहत्येचे प्रमाण थोडे तरी अल्प होईल !