पथनमथिट्टा (केरळ) – केरळमधील एका न्यायालयाने नुकतेच थॉमस सॅम्युअल नावाच्या ६३ वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवून त्याला १०९ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी थॉमस सॅम्युअलने ज्या मुलीवर बलात्कार केला, तिला काही वर्षांपूर्वी त्याने दत्तक घेतले होते. केरळच्या दक्षिणेकडील पथनमथिट्टा जिल्ह्यातील अदूर येथे एका जलदगती विशेष न्यायालयाने पंडलम् येथील रहिवासी असलेल्या थॉमस सेमुअलला वरील शिक्षेसह ६ लाख २५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम १२ वर्षीय पीडित मुलीला देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला सॅम्युअल आणि त्याच्या पत्नीने दत्तक घेतले होते. या जोडप्याला मूलबाळ नव्हते. मुलीला दत्तक घेतल्यानंतर जेव्हा ती सॅम्युअलच्या घरी पोचली तेव्हापासून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे चालू केले. मार्च २०२१ ते मे २०२२ या एका वर्षाच्या कालावधीत त्याने तिला धमकावत तिच्यावर क्रूरपणे लैंगिक अत्याचार केले आणि तिचा छळ केला.
नंतर सॅम्युअलने त्याची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत, बाल कल्याण समितीला मुलीला कह्यात घेण्याची विनंती केली. यानंतर त्या मुलीला दुसर्या एका कुटुंबाने दत्तक घेतले. पीडित मुलीने तिच्यावर झालेल्या लैंगिक छळाची माहिती कुटुंबियांना सांगितली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पंडलम् पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले. न्यायालयाने ‘पॉक्सो’ कायद्याच्या विविध कलमांच्या अंतर्गत आरोपीला कठोर शिक्षा ठोठावली.