Vivek Ramaswamy on Israel : मी राष्ट्राध्यक्ष झालो, तर इतरांच्या युद्धात हस्तक्षेप करणार नाही !

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांची भूमिका

अमेरिकेने इस्रायलला शस्त्रे पाठवणे बंद करावे – विवेक रामास्वामी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने इस्रायलला शस्त्रे पाठवणे बंद करावे लागेल. इस्रायलला पैशांद्वारेही साहाय्य करू नये, तर मुत्सद्देगिरीच्या पातळीवर साहाय्य करावे, यानेच इस्रायल स्वत:च्या पायावर उभा राहू शकेल, अशी भूमिका अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत असलेले भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी घेतली.

रामास्वामी पुढे म्हणाले की…

१. जर मी राष्ट्राध्यक्ष झालो, तर ‘तिसरे महायुद्ध होऊ नये’, हे माझे पहिले लक्ष्य असेल. मी प्रत्येक अधिकार्‍याला शपथ घ्यायला लावीन की, युद्धाला आमचे प्राधान्य असणार नाही. अमेरिकी खासदारांचे पहिले कर्तव्य ‘अमेरिकी नागरिकांचे हित जोपासणे’, हे असेल.

२. पुढची २० वर्षे तुमचे हित बाजूला ठेवून तुम्हाला अनावश्यक युद्ध करायचे असेल, तर मी तुमच्यासाठी योग्य नाही; परंतु जर तुम्हाला अमेरिकेला या युद्धांपासून दूर ठेवून सशक्त बनवायचे असेल, तर मी ते करू शकतो.

३. शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका इतर देशांच्या कारभारात ढवळाढवळ करणार नाही. यासह अमेरिका शांततेसाठी बळाचा वापर करणार नाही.

४. ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलतांना रामास्वामी म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाच्या आणखी एका उमेदवार निक्की हेली त्यांच्या आक्रमक परराष्ट्र धोरणांमुळे अमेरिकेला रक्तरंजित संघर्षात ओढतील.

आंतरराष्ट्रीय संघर्षांसंदर्भात ट्रम्प आणि रामास्वामी यांच्या भूमिकेत आकाश-पाताळाइतका भेद !

रिपब्लिकन पक्षाचे मुख्य उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर असलेले रामास्वामी यांचे अनेक विषयांत ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळी मते आहेत.

१. रशिया-युक्रेन युद्ध : रामास्वामी यांच्या मतानुसार, अमेरिकेने युक्रेनला युद्धात साहाय्य करणे थांबवावे. युक्रेनने त्याचा पूर्व भाग रशियाला द्यावा; परंतु त्यासाठी रशियाला चीनसमवेतचे सहकार्य संपवावे लागेल. अमेरिकेने युक्रेनला ‘नाटो’मध्ये सहभागी होऊ देऊ नये आणि रशियावर लादलेले सर्व निर्बंधही हटवावेत. दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्ध २४ घंट्यांत संपुष्टात आणण्याचा दावा ट्रम्प सातत्याने करत आहेत.

२. चीन-तैवान युद्ध : जोपर्यंत तैवान आम्हाला ‘सेमीकंडक्टर’ पुरवत आहे, तोपर्यंतच अमेरिकेने तैवानवरील चीनचे आक्रमण थांबवण्यास साहाय्य केले पाहिजे. यासमवेतच ‘सेमीकंडक्टर’ बनवण्यासाठी अमेरिकेने तैवानखेरीज दुसरी जागा शोधली पाहिजे, असे रामास्वामी यांची भूमिका आहे. दुसरीकडे ट्रम्प यांचा यावर विश्‍वास नाही. चीन-तैवानच्या सूत्रावर ट्रम्प यांनी नेहमीच तैवानचे समर्थन केले आहे. आवश्यकता पडल्यास तैवानमध्ये युद्ध लढण्यासाठी अमेरिकी सैन्य पाठवू, असे ट्रम्प म्हणाले होते.