|
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘केवळ हिंदुहिताची गोष्ट करणार नाही, तर कार्य करणार’, या धोरणानुसार हिंदु राष्ट्र आणि हिंदुहित, या सूत्रांवर कार्य करण्याचे वचन देणारे राजकीय पक्ष अन् प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत हिंदूंचा पाठिंबा मिळेल, असा ठराव येथे ४ आणि ५ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनात संमत करण्यात आल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे या अधिवेशनानंतर येथील येथील पराडकर भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश अन् बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते.
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले की, या अधिवेशनात नेपाळ, तसेच भारतातील उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, देहली, आसाम आणि बंगाल या राज्यांतील ५१ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, मंदिरांचे विश्वस्त, उद्योगपती आदी २१० जण उपस्थित होते. या वेळी भविष्यात हिंदुहितासाठी राजकीय पक्षांनी कोणते कार्य करणे अपेक्षित आहे, यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्ट्र घोषित करणे, लव्ह जिहाद, धर्मांतर अन् गोहत्या यांवर कठोर कायदा करणे, हलाल प्रमाणपत्रावर बंदी घालणे, मंदिरांचे सरकारकरण रहित करणे, धार्मिक स्थळ अधिनियम रहित करणे, वक्फ बोर्ड कायदा रहित करणे, लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवणे, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करणे आदींवर हिंदुत्वनिष्ठांचे राजकीय पक्षांसाठी मागणीपत्र बनवण्यात आले. हे मागणीपत्र राजकीय पक्षांसमोर मांडले जाणार आहे.
१०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचे उद्दिष्ट ! – चेतन राजहंस
श्री. चेतन राजहंस म्हणाले की, मंदिर संस्कृती रक्षण आणि संवर्धन यांसाठी १०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.