परात्‍पर गुरु डॉ. आठवले ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकाला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी देत असलेल्‍या विविध विषयांवरील प्रश्‍नांची जाणवलेली वैशिष्‍ट्ये !

‘वर्ष २००३ पासून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्‍यात्‍मावर आधारित विविध विषयांवरील प्रश्‍न मला दिले. त्‍या प्रश्‍नांची उत्तरे देवाच्‍या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्‍त झाली आहेत. त्‍या प्रश्‍नांची जाणवलेली वैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्‍वतःला सनातन धर्माच्‍या सेवेला आजन्‍म वाहून घेतल्‍याविषयीचे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे बोल !

‘वर्ष २००३ मध्‍ये एकदा परात्‍पर गुरु डॉ. आठवले मला म्‍हणाले, ‘‘मी ( परात्‍पर गुरु डॉ. आठवले ) माझ्‍या रक्‍ताच्‍या शेवटच्‍या थेंबापर्यंत सनातन धर्माची सेवा करत राहीन.’’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०२३) 

श्री. राम होनप

१. प्राचीन काळापासून ऋषिमुनींनी सनातन धर्मावर आधारित सहस्रो ग्रंथांची रचना केली आहे. त्‍यांत ज्‍या विषयांचा आजपर्यंत अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार अभ्‍यास झालेला नाही, अशा विषयांवर परात्‍पर गुरु डॉक्‍टर प्रश्‍न विचारतात, उदा. ‘जोराचा वारा आल्‍यावर वृक्षांच्‍या फांद्या हलतात; परंतु त्‍या खाली पडत नाहीत. त्‍यामागील कारण काय ?’, ‘पक्षी घरट्यापासून दूर अंतरावर जातात आणि काही वेळाने परत घरट्याकडे येतात. त्‍यांना स्‍वतःचे घरटे कसे लक्षात रहाते ?’, ‘पती-पत्नींमध्‍ये पतीचे वय अधिक असल्‍याने पतीचा मृत्‍यू आधी होतो. पुढे पत्नी रुग्‍णाईत असतांना तिची सेवा करण्‍यासाठी पती नसतो. हाच त्‍यांच्‍यातील देवाण-घेवाण हिशोब असतो का ?’ इत्‍यादी, तसेच सध्‍याच्‍या काळात हिंदूंना साधना किंवा धर्माचरण करतांना पडणारे प्रश्‍न, उदा. ‘शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालतात ?’, ‘गणपतीला लाल फुले का वहातात ?’ इत्‍यादी.

२. प्रश्‍नाचा विषय सर्वसाधारण व्‍यक्‍तीच्‍या बुद्धीला सहजतेने समजणारा असतो.

३. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना विविध विषयांवरील प्रश्‍न काळानुरूप विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांद्वारे प्राप्‍त झालेले असतात.

४. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे प्रश्‍न वाचूनच माझ्‍या मनाला पुष्‍कळ आनंद होतो. साधक मला विचारतात, ‘‘सध्‍या परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तुला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी कोणते प्रश्‍न दिले आहेत ?’’ तेव्‍हा मी त्‍यांना काही प्रश्‍न सांगतो. ते ऐकून साधकांनाही आनंद मिळतो.

५. परात्‍पर गुरु डॉक्‍टर सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी विविध प्रश्‍नांच्‍या संगणकीय धारिका मला पाठवतात. ‘त्‍या प्रश्‍नांमध्‍ये परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठीचा आशीर्वादही दिला आहे’, असे मला नेहमी जाणवते. त्‍यामुळे कुठल्‍याही ग्रंथामध्‍ये उपलब्‍ध नसलेले दुर्मिळ ज्ञान सूक्ष्मातून मला सहजतेने प्राप्‍त होते.’

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.